लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. याविषयी लोकांच्या मनात असलेला संशय कोणत्याही परिस्थितीत दूर करायला हवा आणि त्याची जबाबदारी शासनाचीच आहे, असे स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरातील नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी तटकरे हे शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी तटकरे म्हणाले, आपल्या माहितीनुसार अतिवृष्टी, भरतीचे पाणी व कोयना अवजल या तीन कारणांमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. मात्र, कोयना अवजलविषयी वेगवेगळी माहिती पुढे येत असेल तर लोकांच्या मनात संशय असता कामा नये. त्याची चौकशी केली जाईल. तसेच पूरग्रस्त भागातील बाधित कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळायला हवी. तेव्हा पंचनाम्याची प्रक्रिया ज्या भागात पूर्ण झाली आहे अशा ठिकाणी मदत पुरविण्याविषयी सूचना दिल्या जातील.
याशिवाय खेड-पोसरे येथे दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देताना त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने तिवरे धरणाचे काम होण्याची गरज आहे. त्याचाही प्रभाव चिपळूणच्या पूरपरिस्थितीवर होताना दिसत आहे. रायगडमध्ये नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारल्यानंतर पूररेषेवर नियंत्रण आले आहे. त्याच पद्धतीने चिपळुणात प्रयत्न करायला हवेत. कोणत्याही परिस्थितीत कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची गरज आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.