देवरुख : कोविड रुग्णांसाठी मातृमंदिरचे कोविड सेंटर वरदान ठरत आहे. तिसरी लाट येत असून त्यासाठी आपण तयार राहणे आवश्यक आहे. कोविड रुग्णांनी घरात न राहता कोविड सेंटरला येऊन उपचार घ्यावेत. कोविड सेंटरला वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आमदार निधीतून ५० लाख रुपये संगमेश्वर तालुक्याला देण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे आरोग्य यंत्रणेला साहित्य पुरविण्यात येत आहे, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले.
देवरुख येथील मातृमंदिर कोविड सेंटरच्या पोस्ट कोविड केअर समुपदेशन केंद्र आणि ऑनलाइन व्हॅक्सिन रेजिस्टेशन उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, तहसीलदार सुहास थोरात, सिनेकलाकार सुशांत शेलार, नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या नेहा कदम, युयुत्सू आर्ते, आत्माराम स्त्री, स्मृती राणे उपस्थित होते. यावेळी सुशांत शेलार म्हणाले की, कोकणात रुग्णसंख्या वाढत आहे. गेले काही दिवस मी कोकणात राहत असल्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येचे गांभीर्य मला माहिती आहे़ मातृमंदिरच्या कोविड सेंटरची अत्यंत आवश्यकता आहे. कोविड समुपदेशन देवरुखबरोबर संगमेश्वरसह चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघात राबवावा, असे म्हणाले.
तहसीलदार सुहास थोरात म्हणाले की, कोविडमध्ये मातृमंदिरने नेहमीच मदत केली आहे. तालुक्याला चांगली मदत मिळेल असा प्रयत्न केलेला आहे. पोस्ट कोविड सेवा मिळवून द्यावी आणि व्हॅक्सिन रजिस्ट्रेशनसारखा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. यासाठी शासकीय काही मदत लागेल ती देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये म्हणाले की, कोविडची लक्षणे दिसल्यानंतर सुविधा मिळत नसल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला. हे पाहून दु:ख झाले आणि मातृमंदिरमध्ये कोविड सेंटर सुरू केले. कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ५ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत, असे सांगितले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युयुत्सू आर्ते यांनी केले, तर आभार आत्माराम मेस्त्री यांनी मानले.
--------------------------
१ लाख २६ हजार रुपयांची मदत
आ. शेखर निकम यांनी देवरुख मातृमंदिरच्या कोविड सेंटरसाठी चिपळूण तालुक्यातील उद्योजक आणि संस्थांच्या माध्यमातून १ लाख २६ हजार रुपयांची मदत केली. यामध्ये सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित सावर्डे, समीर चव्हाण यांच्याकडून २५ हजार, महेश घाग चिपळूण १५ हजार, अभिषेक सुर्वे ११ हजार रुपयांचा समावेश आहे़
---------------------------------
मातृमंदिरमध्ये आयोजित कार्यक्रमात आ. शेखर निकम यांनी मनाेगत व्यक्त केले़ यावेळी तहसीलदार सुहास थोरात, मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, सिनेकलाकार सुशांत शेलार, स्मृती राणे उपस्थित हाेते़