रत्नागिरी : स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरील प्रसाधनगृहांमध्येच अस्वच्छता, घाण, दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे प्रसाधनगृहांअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. या अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिध्द करून दणका दिल्यानंतर रेल्वेच्या स्वच्छता विभाग खडबडून जागा झाला. अखेर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ वरील प्रसाधनगृहाची स्वच्छता करण्यात आली आहे. मात्र, प्लॅटफॉर्म २ वरील प्रसाधनगृहाची समस्या अद्याप सुटलेली नाही. दोन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात स्वच्छता मोहिमेचा नारा दिला होता. त्यानुसार केवळ स्वच्छता मोहीम राबवून प्रसिध्दी मिळवली जात होती. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, चिपळूणसह सर्वच रेल्वे स्थानकांवर ही स्वच्छता मोहीम गाजावाजा करून राबवण्यात आली होती. मात्र, दिव्याखाली अंधार म्हणतात तसे महत्त्वाची असलेली स्थानकावरील प्रसाधनगृहे घाणीने बरबटलेली होती. प्लॅटफॉर्म क्र. १ वरील पुरुष व महिलांसाठीची प्रसाधनगृह घाणीने भरलेली होती. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. याप्रकरणी कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयानेही गंभीर दखल घेत रत्नागिरीतील स्थितीची पाहणी करून स्थानकातील संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडतीही घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी येथील यंत्रणा हालली व प्लॅटफॉर्म नंबर १ वरील प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रसाधनगृह आता प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहेत. २ आॅक्टोबरला कोकण रेल्वेने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत कोकण रेल्वेचे ६ हजार कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानुसार रत्नागिरी स्थानकातही प्रसाधनगृहांचा अपवादवगळता इतरत्र चांगल्या प्रकारे स्वच्छता झाली होती. त्यातही काही कर्मचाऱ्यांनीच मनापासून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. परंतु बहुतांश कर्मचारी केवळ हातात झाडू घेऊन फोटो काढण्यापुरतेच स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र होते. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील प्रसाधनगृहाजवळच असलेले गटार कचरा व सांडपाण्याने भरलेले आहे. त्यामुळे डासांची समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)स्वच्छतेसाठीचे ते उपाय....पथनाट्यांचे सर्व स्थानकांवर पुन्हा सादरीकरण करा२ आॅक्टोबर २०१४ रोजी दुपारी कर्मचाऱ्यांनीच स्वच्छतेचे महत्व सांगणारी व प्रबोधन करणारी तीन पथनाट्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रभावीरित्या सादर करण्यात आली होती. ही पथनाट्ये मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पुन्हा सादर करण्याची व त्यातून स्वच्छतेबाबत सातत्याने प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रसाधनगृहात हवी स्वच्छताकोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी हे अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. येथे कोकण रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे. तसेच या स्थानकावर मार्गावरून कमी पल्ल्याच्या तसेच लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्यांना थांबा आहे. अशा महत्त्वाच्या स्थानकावरील स्वच्छता व प्रसाधनगृह सुविधेबाबत रेल्वेने सातत्याने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. या महत्त्वाच्या स्थानकावरच प्रसाधनगृहांबाबत भयावह स्थिती असेल तर अन्य स्थानकांवरील स्थितीबाबत कल्पनाच न केलेली बरी, अशी प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.
स्वच्छतेबाबत कोकण रेल्वे ‘रुळावर’
By admin | Updated: December 9, 2014 23:16 IST