देवरुख : घरच्यासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार कोंडआंबेड संगमेश्वर येथील चिंतामणी भंडारी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. सध्या कोंडआंबेड (तेलीवाडी) संगमेश्वर आणि मुळगाव थेरांडा (विक्रमगड, पालघर) येथील चिंतामणी भंडारी हे कामानिमित्त संगमेश्वर तालुक्यात रहात असून ते प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडउमरे येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम करत आहेत. भंडारी यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी (एमएच ०४ सीके ७२४७) ही मोटरसायकल घरासमोर उभी करुन ठेवली होती. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी मोटरसायकल घराबाहेर होती मात्र शनिवारी सकाळी उठल्यानंतर चिंतामणी भंडारी हे घराबाहेर पडले तेव्हा नेहमीच्या जागी उभी केलेली मोटरसायकल त्यांना दिसून आली नाही. यावेळी त्यांनी शोधाशोध करुन मोटारसायकल कुठेच दिसून आली नाही. तसेच सापडली देखील नाही. यानंतर तात्काळ भंडारी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डिंगणी दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल एस्. पी. गुजर करत आहेत. दरम्यान संगमेश्वर तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यात मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरुन उघड होत आहे. (प्रतिनिधी)
कोंडआंबेडला मध्यरात्री दुचाकी चोरीला
By admin | Updated: February 15, 2015 00:44 IST