खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयानजीक स्कॉर्पिओने रस्ता ओलांडणार्या महिलेला जोराची ठोकर दिली. यात ती महिला जागीच गतप्राण झाली. द्रोपदी बाळाजी निकम (५0, कुळवंडी) असे त्या महिलेचे नाव आहे. तिचे शव विच्छेदनासाठी खेड नगरपरिषदेच्या शवागृहामध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, स्कॉर्पिओच्या चालकाने गाडीसह पलायन केले असून, पोलीस त्याच्या शोधात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे याबाबत तपास करीत आहेत. हा अपघात २.१५ वाजता घडला. याबाबतची खबर कळंबणी गावचे पोलीसपाटील नरसिंग दिनकर सुतार यांनी खेड पोलिसांत दिली. द्रौपदी यांचा आजारी असणारा मुलगा रूग्णालयात दाखल आहे. त्या आपल्या मुलाला पाहण्यासाठी रूग्णालयात जात होत्या. याचवेळी रस्ता ओलांडताना मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच अंत झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
कळंबणी येथील अपघातात कुळवंडीची महिला ठार
By admin | Updated: May 31, 2014 01:18 IST