रत्नागिरी / टेंभ्ये : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. फेब्रुवारी २०१२ पासून सलग तीन वर्षे राज्यात अव्वल राहण्याचा बहुमान कोकण विभागीय मंडळाने मिळविला आहे. राज्यात अव्वल राहण्याची हॅट्ट्रिक साधणारे कोकण विभागीय मंडळ हे राज्यातील एकमेव विभागीय मंडळ आहे. फेब्रुवारी / मार्च २०१४ मध्ये झालेल्या १२ वी परीक्षेला एकूण ३२ हजार ३९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३० हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८५ टक्के असून, राज्यातील अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत ही टक्केवारी तीन टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागानंतर दुसरे स्थान ९१.८५ टक्क्यांसह अमरावती विभागाने, तर तिसरे स्थान ९१.५४ टक्केनिकालासह कोल्हापूर विभागाने पटकावला आहे. कोकण विभागातून विज्ञान शाखेमध्ये ७,७४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी ७,२९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमधील १०,४८४ विद्यार्थ्यांपैकी ९,६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेमधील १२,१७१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ११,८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर एमसीव्हीसी शाखेमधील २००३ विद्यार्थ्यांपैकी १९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून १७ हजार ९३९ मुले व १५ हजार ३५७ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. यापैकी १५ हजार ८४८ मुले व १४ हजार ८७८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले व मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाणे राज्यात अव्वल आहे.मुलींबरोबर मुलांनीही राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. विभागातून ९३.०१ टक्केमुले उत्तीर्ण झाली असून, हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत कोकण विभागातील मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण जवळपास चार टक्क्यांनी अधिक आहे. (वार्ताहर) तीन शाखा राज्यात प्रथम स्थानावर कला, वाणिज्य व एमसीव्हीसी शाखांचा निकाल राज्यात प्रथम स्थानावर आहे. कला शाखेचा निकाल ९२.२५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९७.२८ टक्के, तर एमसीव्हीसीचा निकाल ९५.९६ टक्केलागला आहे. यापैकी कला व वाणिज्य शाखेचा निकाल राज्यातील अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत ३ ते ४ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष बाब म्हणजे चारही शाखांचे निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. अशा पद्धतीचा निकाल असणारे कोकण विभागीय मंडळ एकमेव आहे. गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यात अव्वल गैरमार्ग मुक्त परीक्षा घेण्यात कोकण विभागीय मंडळ राज्यात अव्वल स्थानावर आहे. कोकण विभागातून केवळ ११ गैरप्रकारांची नोंद झाली असून, राज्यात हे सर्वांत कमी प्रमाण आहे. नागपूर विभागातून सर्वाधिक ३२६ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. कोकण विभागातील ४७ परीक्षा केंद्रांपैकी ३५ परीक्षा केंद्रांना भरारी पथकानी भेट दिली आहे.
कोकणची हॅट्ट्रिक
By admin | Updated: June 3, 2014 02:14 IST