दापोली : क्वालिस गाडी झाडावर आदळल्याने तालुक्यातील कोळबांद्रे-कुंभारवाडी येथील स्वप्निल शिवणकर या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्यामुळे कोळबांद्रे गावावर शोककळा पसरली आहे. ही दुर्घटना आज, मंगळवारी सकाळी ११.३० वाजता घडली असून, या गाडीत स्वप्निलसह पाचजण होते. इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.स्वप्निल मुंबई-दादर येथील कोहिनूर इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता. शिवणकर कुटुंबीय गणपतीकरिता आपल्या गावी आले होते. आज, मंगळवारी सकाळी आपल्या घरच्या गणपतीची आरती करून स्वप्निलच्या जालगाव येथील बहिणीला भेटण्यासाठी सर्वजण निघाले होते. स्वप्निल पुढील सीटवर बसला होता. गाडी शिर्दे वळणावर आली असता ती रस्त्याच्या खाली उतरून रस्त्याशेजारील झाडांना घासत पुढे गेली व समोरच्या झाडावर जाऊन आदळली. गाडीच्या काचा फुटल्या .काही काचा स्वप्निलच्या अंगात घुसल्या. त्यामुळे अधिक रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला.सामाजिक कार्यकर्ते संदीप देसाई यांना अपघात झाल्याचे कळताच गाडी घेऊन ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्वप्निल व इतरांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, स्वप्निलचा उपचाराआधीच मृत्यू झाला. हॉटेल मॅनेजमेंट करून करिअर करण्याचे स्वप्निलचे स्वप्न होते. त्याच्या अपघाती मृत्यूने हे स्वप्न आता स्वप्नच राहिले आहे. त्याच्या आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थित साऱ्यांचेच काळीज हेलावले. गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर तो मुंबईला जाणार होता. त्याचा मोठा मित्रपरिवार आहे. या कुटुंबाने अलीकडेच क्वालिस गाडी विकत घेतली होती. (प्रतिनिधी)
क्वालिस झाडावर आदळून तरुण ठार
By admin | Updated: September 2, 2014 23:37 IST