रत्नागिरी: प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द व चिकाटी या गुणांच्या बळावर रत्नागिरीतल्या १६ वर्षीय श्रद्धाने इतिहास घडविला आहे. दहावीच्या सहामाही परीक्षेच्या तोंडावरच तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. लहानपणापासूनच अपंगत्व आणि त्यात किडन्या निकामी झाल्याने आभाळ कोसळले. परंतु तिने हार मानली नाही. परीक्षेच्या वेळात एक दिवस आड डायलेसिसचा उपचार घेत श्रध्दाने परीक्षा दिली व प्रतिकूल स्थितीतही ७० टक्के गुण मिळविले.जगण्याची उमेद घेऊन धडपडणारी अ. के. देसाई शाळेची विद्यार्थिनी श्रध्दा लोटणकर खरेतर मृत्यूशी झूंज देत आहे. जन्मत:च विकलांग असलेल्या श्रध्दाला दैवाची साथ कधी मिळालीच नाही. पाठीला गाठ आल्यानंतर तिच्या दोन्ही पायातील शक्तीच गेली. त्यानंतर आजपर्यंत तिला काठीचा आधार घेतल्याशिवाय हालचाल करणेही शक्य नाही. या स्थितीतही तिने हार न मानता दहावीपर्यंत मजल मारली. मात्र दहावीत असतानाच तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले अन लोटणकर कुटुंबाला धक्काच बसला. आता आई-वडील तिला वाचविण्यासाठी कमालीचे जिद्दी बनले आहेत. श्रद्धाला शिकून वकील व्हायचं आहे. तिच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी किडनी बदलणे आवश्यक आहे. पण किडनी बदलण्यासाठी १६ लाख रुपये उभे करण्यात मात्र तिच्या आई-वडिलांची दमछाक होत आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. दहावीची परीक्षा तिच्यासाठी महत्वाची होती. आरोग्य साथ देत नव्हते. तरीही दिवसआड डायलेसीस उपचार घेत तिने दहावीचे पेपर दिले. उत्तरपत्रिका लिहितानाही तिला रक्तदाबाचा त्रासही झाला. परंतु तिने हार न मानता ७० टक्के गुण मिळविले आहेत. (प्रतिनिधी)
किडन्या निकामी होऊनही ती लढलीच!
By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST