चिपळूण : खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही बसविण्याचा ठराव झाला होता. त्याची प्रक्रियाही सुरू झाली हाेती. कोरोना कालावधीत ही यंत्रणा उभारणीत अडचणी आल्या. खेर्डी ग्रामपंचायतीकडून येत्या काही दिवसात सीसीटीव्हीची यंत्रणा उभारली जाईल व आगामी काळात सीसीटीव्ही बसणारच असल्याने काहीजण निवेदन देत याचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याचे मत सरपंच वृंदा दाते व युवा नेते विनोद भुरण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर व दाभोळकर गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी खेर्डीत ग्रामपंचायतीतर्फे सीसीटीव्ही बसविण्यासाठी निवेदन दिले होते. शहरातील भोंगाळे येथे भरवस्तीमध्ये तरूणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्याची मागणी दिशा दाभोळकर व सहकाऱ्यांनी केली होती. त्यावर सरपंच वृंदा दाते व सदस्य विनोद भुरण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, चार महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेत सीसीटीव्ही बसविण्यासाठीचा ठराव केला होता. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव वाढतच गेला. त्यामुळे बाजारपेठाही बंद आहेत. गावातील चौका-चौकात ग्रामपंचायतीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे परवडणारे नाही. त्यामुळे टेरव रोड, रेल्वे पूल आदीसह काही ठिकाणी तेथील दुकानदारांकडून सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम ग्रामपंचायतीसमोरील चिपळूण - कऱ्हाड महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे. कोरोना कालावधीत या वस्तू मिळणे दुरापास्त असल्याने हे काम रखडले. मात्र, येत्या काही दिवसात सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाईल. ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणार आहेत, हे ओळखूनच पदाधिकाऱ्यांनी सरपंचांना निवेदन दिले आहे. आम्ही निवेदन दिले म्हणून ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही बसवले, असे श्रेय घ्यायला निवेदनकर्ते कमी पडणार नाहीत, असे मतही भुरण यांनी व्यक्त केले.