दापाेली : कृषीची दुकाने बंद का? ती दिवसभर उघडी ठेवण्यास मुभा द्या, अशा सक्त सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दापोली प्रांताधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या. दापोली पंचायत समिती सभागृह येथे तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानाचा व कोरोना परिस्थितीत आढावा त्यांनी घेतला़ या आढावा बैठकीत त्यांनी कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली़
चक्रीवादळातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे शनिवारी दापाेलीत आले हाेते़ यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली़ दापोलीत आजही ५५० रुग्ण क्वारंटाईन आहेत. मात्र, येथे परिपूर्ण सुविधा नसल्याने रुग्णाचे हाल होत आहेत. त्यासाठी क्वारंटाईन सेंटर्स वाढवा. तालुक्यात एकच रुग्णवाहिका असून ती अपुरी पडत आहे. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घ्या, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. तिसरी लाट येणार असून, त्याचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे. त्यासाठी यंत्रणेने व प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
तौक्ते या चक्रीवादळात आंबा, काजू बांगांचे मोठे नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई तत्काळ मिळावी म्हणून प्रयत्न करणार असून केंद्राकडेही भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणारा असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम, बाबाजी जाधव, उपसभापती ममता शिंदे, राष्ट्रवादीचे पक्षप्रवक्ते मुजीब रुमाणे, माजी सभापती राजेश गुजर, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.