चिपळूण : आठ दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांच्या केबिनच्या दरवाजाचे कुलूप लॉक झाल्याने ते केबिनमध्येच अडकून पडले होते. हे कुलूप दुरुस्त करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना करुनही दुर्लक्ष करण्यात आले आहे.उपनगराध्यक्ष शाह हे नेहमीप्रमाणे आपल्या केबिनमध्ये बसले होते. यावेळी काही नागरिक कामानिमित्त त्यांच्या केबिनमध्ये आले होते. नागरिकांशी चर्चा करीत असताना अचानक केबिनच्या दरवाजाचे कुलूप लॉक झाले. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. बांधकाम विभागातील विनायक सावंत यांना याबाबत सांगण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बंद झालेले कुलूप एक्सो ब्लेडच्या सहायाने तोडण्यात आले. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यास कुलूप दुरुस्त करण्याची सूचना उपनगराध्यक्ष शाह यांनी केली होती. या प्रकारास आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी केबिनचे कुलूप दुरुस्त करण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या कारभाराबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजूनही कुलूपविना केबिन किती दिवस राहणार, अशी चर्चाही नागरिकांमधून केली जात आहे. (वार्ताहर)
केबीन अद्याप कुलूपाविनाच
By admin | Updated: July 6, 2014 23:55 IST