कणकवली : राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत कोकण विभागात कणकवली तहसील कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. येथील तहसील कार्यालयाच्यावतीने नागरिकांना पुरविण्यात आलेल्या विविध सुविधांचे मूल्यांकन करुन हा बहुमान देण्यात आला आहे.राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राज्यात दरवर्षी स्पर्धा घेण्यात येते. तहसील कार्यालयाकडून जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच लोकाभिमुख कारभार व्हावा यासाठी शासनाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना चांगली सेवा दिल्यानंतर अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिकही दिले जाते. कणकवलीचे तहसीलदार समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरात चांगले काम केले आहे. त्याची दखल घेत पारितोषिक देण्यात आले आहे. नागरिकांना चांगल्या प्रशासकीय सुविधा देणे, रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील कामांची संख्या वाढविणे, नागरिकांना आवश्यक असे विविध दाखले निर्धारित वेळेत देणे तसेच वसुलीचे उद्दिष्टही पूर्ण करणे असे अनेक निकष विचारात घेतले जातात. या सर्व बाबींचे मूल्यांकन करुन पुरस्कार दिला जातो. हे सर्व निकष कणकवली तहसील कार्यालयाने पूर्ण केले आहेत. त्यामुळे कोकण विभागात कणकवली तहसील कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला असून ७0 हजारचे पारितोषिकही या कार्यालयाला मिळाले आहे. (वार्ताहर)
कणकवली तहसील द्वितीय
By admin | Updated: July 16, 2015 00:22 IST