रत्नागिरी : ‘अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ जिथे ना कुणी बांधिला पेटली ना वात’ अशा शब्दांत कवी कुसुमाग्रजांनी जवानांची व्यथा मांडली. यामुळे सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांची स्मृती राहावी, या हेतूने दि न्यू एज्युकेशन सोसायटी व परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिराने कारगिल दिनाचे औचित्य साधून मशाल फेरी काढली.कारगिल विजय दिन व आषाढ अमावास्येचे औचित्य साधून २६ रोजी सायंकाळी प्राथमिक विद्यामंदिरपासून मशाल फेरीला सुरुवात झाली. तत्पूर्वी शाळेमध्ये सुरेख रांगोळीसह पणत्या लाऊन दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. हिंदू संस्कृतीत आषाढ अमावास्येला महत्त्वाचे स्थान आहे. दु:ख दूर होऊन जीवन प्रकाशमय होण्यासाठी दिव्यांचे पूजन केले जाते. मात्र, अलिकडे ‘गटारी’च्या नावाखाली वाट्टेल ते करण्याचे फॅड आले आहे. ही चुकीची प्रथा आहे. विद्यार्थ्यांना जवानांचे बलिदान व त्याचे महत्व समजावून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.एनसीसीच्या छात्रांनी मशाली घेतल्या होत्या. तसेच फाटक हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शहरातील अन्य नागरिक या फेरीमध्ये सहभागी झाले. लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दाक्षायिणी बोपर्डीकर, कौन्सिल सदस्य मुन्ना सुर्वे, जयंत प्रभूदेसाई, विशाखा भिडे, परुळेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जवानोत्सवातून विद्यार्थ्यांची जवानांना आदरांजली
By admin | Updated: July 27, 2014 23:02 IST