रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. व्यायसायिक अभ्यासक्रम एक ते दोन वर्षांचे असल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, या आशेने विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु गतवर्षीपासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप आयटीआयचे संकेतस्थळ लॉक असल्यामुळे पालक, विद्यार्थीवर्ग हैराण झाला आहे. शहरातील नाचणे रोड येथे असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी आणि १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. सुतारकाम, यांत्रिक डिझेल, शिवणकाम, संधाता, आरेखक स्थापत्य व यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक उपकरण, यंत्रकारागीर, यांत्रिक मोटारगाडी, तारतंत्री, यांत्रिक प्रशिक्षण व वातानुकूलीकरण आदी १४ प्रकारच्या अभ्यासक्रमासमवेत पंप आॅपरेटर कम मेकॅनिक, कॉम्प्युटर आॅपरेटर अॅण्ड प्रोग्रॅमिंग, इंटेरियर डेकोरेशन डिझायनिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग आॅपरेटर, क्रॉफ्ट्समन फूड प्रॉडक्शन (जनरल), फ्रंट असिस्टंट, आयटीईएसएम, एमएमटीएम, फॅब्रिकेशन सेक्टर बेसीक व अॅडव्हान्स, स्टीवर्ड आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिवणकाम, ड्रेसमेकिंग, हेअर अॅड स्कीन, इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, फ्रूटस् अॅड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर्स आॅपरेटर अशा प्रकारचे अभ्यास क्रम शिकविण्यात येतात. सुमारे १५० विद्यार्थिनीना प्रवेश देण्यात येतो. काही अभ्यासक्रम १९६९ पूर्वी सुरू झाले आहेत, तर काही अभ्यासक्रम शासनाने २००० पासून टप्प्याटप्प्याने सुरू केले आहेत.गोरगरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी दोन वर्षात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी, व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, यासाठी औद्योगिक केंद्रात प्रशिक्षण घेतात. गतवर्षीपासून अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, निकाल लागल्यापासून विद्यार्थी व पालकवर्ग आयटीआयच्या संकेतस्थळावर प्रवेश नोंदविण्यासाठी सायबर कॅफेमध्ये फेऱ्या मारीत आहेत. २६ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आले. २७ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र, २७ रोजी संकेतस्थळ सुरू न झाल्यामुळे पाच जुलैपासून संकेतस्थळ सुरू होईल, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा संकेतस्थळ सुरू न झाल्यामुळे उद्यापासून (१० जून) संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे.सध्या संकेतस्थळ बंद असल्याने प्रवेशइच्छुक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागले आहेत. गेले अनेक दिवस ही समस्या सुरू आहे.रत्नागिरी येथील आयटीआयमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांतील विद्यार्थी प्रवेश घेतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशासाठी शहराकडे यावे लागत आहे. त्यांना सातत्याने फेऱ्या माराव्या लागत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. (प्रतिनिधी)
आयटीआयचे संकेतस्थळ बंदच
By admin | Updated: July 9, 2014 23:54 IST