लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : ही कार्यशाळा म्हणजे केवळ इतिहास नाही, तर गेल्या सहा-सात हजार वर्षांत आपल्या संस्कृतीचा-समाजाचा प्रवास कसा झाला, वैचारिक जडणघडण कशी झाली, आपल्या भूगोलाचा आपल्यावर कसा परिणाम झाला, याचा धांडोळा आहे. त्याबरोबरच या गतकाळाचा आपल्या वर्तमानकाळावर आज नक्की कोणता प्रभाव आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमातून ताे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे, असे विनीत वाघे यांनी सांगितले.
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे विज्ञान व इतिहास विषयांवर आधारित कार्यशाळा पार पडली. यासाठी सेवासाधना प्रतिष्ठान केतकी (ता.चिपळूण) व अमरजीत चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. विनीत वाघे, बाळकृष्ण चव्हाण व अजय गुढेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा प्रतिनिधी जी.डी. सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक योगेश मुळे यांनी केले. शाळेत प्रथमच दृकश्राव्य माध्यमातून अशा स्वरूपाच्या मार्गदर्शनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात ‘आपण कोठून आलोय’ या विषयाद्वारे विनीत वाघे यांनी जीवसृष्टीचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उभा केला. बिग बँग म्हणजे काय, आकाशगंगा कशी निर्माण होते, सूर्यमाला आणि पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वीवर जीवनाला झालेली सुरुवात, मानवाची उत्क्रांती, पाषाणयुग, शेती व संस्कृतीचा विकास हे सर्व विषय एकत्रितपणे प्रकाशचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत उलगडून सांगितले.
त्यानंतर, ‘भारताची जडणघडण’ या विषयाचा धावता आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे नोंदविल्या. संस्थेचे कार्याध्यक्ष संजय शिर्के, तसेच संचालिका सुमित्रा शिर्के यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन साक्षी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला ओंकार मोहिते व सुप्रिया पवार यांचेही सहकार्य लाभले.
100921\142620210910_162403.jpg
सत्कार करताना