दापोली : मच्छीमार बांधवांचा हक्काचा डिझेल परतावा गेली दोन वर्षे का मिळाला नाही. मच्छीमारांना हक्काच्या डिझेल परताव्याची प्रतीक्षा करण्याची वेळच का येते, असे म्हणत दापोलीचे आमदार संजय कदम यांनी मच्छीमारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. डिझेल परतावा दोन दिवसात मिळायला हवा म्हणत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे सोमवारपासून मच्छीमारांना परताव्याची रक्कम देण्याचे आश्वासन अधिकाऱ्याने दिल्यामुळे डिझेल परताव्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.दापोली तालुक्यातील मच्छीमारांचा कोट्यधी रुपयाचा डिझेल परतावा गेली २ वर्ष रखडला होता. मच्छीमार सोसायटीने वारंवार विनंती करुनसुद्धा मत्स्य खात्याचे अधिकारी मात्र मच्छीमारांच्या डिझेल परताव्याबाबत गंभीर नव्हते. वारंवार आश्वासने देण्यात येत होती. त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. शासनाकडे पाठपुरावा करुनसुद्धा अधिकारी दाद देत नव्हते. मत्स्य खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदन देऊनही अधिकाऱ्यांवर कोणताही फरक पडला नाही. मच्छीमार बांधवानी दापोलीचे आमदार संजय कदम यांच्याकडे निवेदन देऊन मच्छीमारांच्या परताव्यासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली. आमदार कदम यांनी मच्छीमारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे केवळ आश्वासन न देता मच्छीमार नेत्यांना सोबत घेऊन थेट रत्नागिरी मत्स्य कार्यालय गाठले. कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. आमदार कदम अचानक कार्यालयात दाखल झाल्याने अधिकारी धास्तावले. मच्छीमारांचा हक्काचा डिझेल परतावा का मिळत नाही. भीक नको हक्क द्या. डिझेल परताव्याची रक्कम तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायची आहे का? सरकारने निधी देऊनसुद्धा अधिकारी हलगर्जीपणा करत असतील तर अशा अधिकाऱ्याना आम्ही घरी पाठवू. मच्छीमारांचा डिझेल परतावा मच्छीमार संस्थांच्या खात्यात लवकरच जमा करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भादुले यांनी सांगितल्यावर मच्छीमारांचे समाधान झाले.मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी शासन दरबारी न्याय मागणार असून, मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे.- आमदार संजय कदमतालुक्यातील कोट्यवधी रूपयांचा डिझेल परतावा गेल्या दोन वर्षात न मिळाल्याचे उघड झाल्यामुळे मच्छीमार चिंता व्यक्त करताहेत, अशा परिस्थितीत कदम यांची भूमिका महत्त्वाची आहे.
परताव्याचा प्रश्न सुटणार
By admin | Updated: July 2, 2015 22:49 IST