राजापूर : गृह अलगीकरणमधील कोरोनाबाधित रूग्णांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे शासनाने आता गृह अलगीकरण बंद केले आहे. त्यामुळे आता राजापूर नगर परिषदेतर्फे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी वरचीपेठ शाळा क्रमांक ३ मध्ये लवकरच आयसाेलेशन सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी दिली.
राजापूर नगर परिषद, राजापूर तहसीलदार आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व पुढाकारातून २५ बेडचे हे आयसाेलेशन सेंटर सुरू केले जाणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले. हे आयसाेलेशन सेंटर सुरू झाल्यानंतर शहरात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रूग्णांना याठिकाणी ठेवले जाणार असल्याचेही अॅड. खलिफे यांनी सांगितले.
राजापूर शहरातही गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांकडून नियमांचा भंग केला जात आहे. त्यामुळे राजापूर शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ज्यांच्यामध्ये फार काही लक्षणे नाहीत, त्यांना गृह अलगीकरण वा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे लागत आहे. त्यांच्यासाठी वरचीपेठ शाळा क्रमांक ३ मध्ये २५ बेडचे आयसाेलेशन सेंटर सुरू केले जाणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले. यासाठी राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे व ग्रामीण रूग्णलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांचे सहकार्य मिळत असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले. याठिकाणी आयसाेलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या रूग्णांची नियमित तपासणी करणे, औषधे देणे, जेवण या सुविधा दिल्या जाणार आहेत.