रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी अपूर्ण आहे. चौकशी सुरु होऊन पाच महिने सुरु झाले तरी सिमेंटच्या १८८ बंधाऱ्यांपैकी केवळ ११३ बंधाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित चौकशी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.समुद्राचे पाणी शेतात घुसून जमीन नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी शासनाने बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शासनाच्या पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सिमेंट नाला बांध, वळण बंधारा, सलग समतल चर, अनघड दगडी बांध आदि बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. या बंधाऱ्यांवर सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ४ कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. जिल्ह्यात १८८ बंधाऱ्यांची बांधकामे करण्यात आली होती. त्यामध्ये चिपळूणात ५, गुहागरात ९, संगमेश्वरात २६, राजापुरात ११८ आणि रत्नागिरीतील ३० बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांची कामे स्थानिक स्तरावर करण्यात येत होती. मात्र, सिमेंट बंधारे ज्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत, ती कामे निकृष्ठ दर्जाची असल्याची ओरड आजही सुरु आहे. बंधारे बांधल्यानंतर पाणी आत शिरत असल्याने अनेक ठिकाणचे बंधारे निकृष्ठ असल्याचा जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समिती आणि स्थायी समितीमध्ये या विषयांवरुन जोरदार चर्चा झाली होती. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी बैठकांमध्ये सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केली होती. जिल्हा परिषदेच्या सभांमधील होणाऱ्या चौकशीच्या मागणीची दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली होती. त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी अधिकारी पी. एन. देशमुख यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता या चौकशीसाठी तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या होत्या. या समित्यांनी गेल्या पाच महिन्यात ११३ बंधाऱ्यांची चौकशी केली. त्यामध्ये ८३ बंधारे सुस्थितीत, २३ पाणी नसलेले आणि ७ बंधारे लिकेज असल्याचे स्पष्ट झाले आहे. (शहर वार्ताहर)चौकशी पूर्ण होणार ?शासनाच्या कृषी विभागाने केलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष घातले होते. तरीही ही चौकशी करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईल की नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. गेले पाच महिने ही चौकशी सुरु असून, अद्याप ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या चौकशीसाठी आणखी दिवस लागणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बंधाऱ्यांची चौकशी अद्याप अपूर्णच
By admin | Updated: May 14, 2015 23:57 IST