रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुलांसाठी आहे.
स्पर्धेचा विषय ‘आपल्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाविषयी स्वतःला आलेल्या अनुभवाविषयी पत्र’ ( Write a letter to a family member about your experience with COVID 19 ) असा आहे. या विषयावर स्पर्धकाने केलेले लिखाण पत्राच्या स्वरूपात असले पाहिजे. ज्या मुलांचे वय ३१ मार्च २०२१ रोजी १५ वर्षे पेक्षा जास्त नाही अशी मुले स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. लेखन मराठी, इंग्रजी, हिन्दी यापैकी कुठल्याही एका भाषेत चालेल. संदेश पत्राच्या स्वरूपात असावा व शब्द संख्या ८०० पेक्षा जास्त नसावी. अर्जावरील वय शाळेच्या अधिकाऱ्यानी प्रमाणित केलेले असावे .
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २५ मार्च ही आहे. स्पर्धा रविवार, ४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत होईल. ठिकाण प्रत्येक शाळेला कळविण्यात येईल. सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे . परंतु निवडल्या जाणाऱ्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांना यावर्षी घरूनच सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे सर्व स्पर्धक खालील दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या प्रवेशिका स्पीड पोस्ट पत्राद्वारे दि. ५ एप्रिलपर्यंत पाठवाव्यात. प्रवेशिकेबरोबर सोबतच्या विहित नमुन्यातील अर्ज, वय प्रमाणित करण्याकरिता जन्मदाखला, आधारकार्ड किंवा शाळेचे प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराचे तीन फोटो जोडावेत. प्रवेशिका डायरेक्टर,मुंबई जीपीओ, १४ वा मजला, ४००००१ या पत्यावर स्पीड पोस्ट पत्राद्वारे पाठवाव्यात.
पहिल्या तीन क्रमांकांना राष्ट्रीय स्तरावर बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम ५०,००० रुपये, द्वितीय २५,००० व तृतीय क्रमांकाला १०,००० रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मंडल स्तरावरील प्रथम २५,०००, द्वितीय १०,००० व तृतीय क्रमांक ५,००० रुपये व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक एम. नरसिम्हा स्वामी यांनी केले आहे.