चिपळूण : मूळ जमीन मालकाऐवजी बोगस जमीन मालक उभा करून जमिनीचे खरेदीखत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पंकज रजनीकांत खेडेकर यास चिपळूण सत्र न्यायालयाने बुधवारी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्याच्या वतीने चिपळूणचे ॲड. सुनील गुरव यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.
गुहागर तालुक्यात ही घटना घडली होती. समीर राजाराम जाधव यांनी याबाबत १७ ऑगस्ट रोजी गुहागर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यांच्या मालकीच्या सर्व्हे नं. ८९० या जमिनीचे खरेदीखत परस्पर अन्य व्यक्तीच्या माध्यमातून केल्याची फिर्याद दिली होती. गुहागर रजिस्ट्रार यांच्यासह एकूण ९ जणांवर गुहागर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये पंकज रजनीकांत खेडेकर हेही एक आरोपी होते.
चिपळूण येथील ॲड. सुनील गुरव यांनी पंकज खेडेकर याचे वकीलपत्र घेऊन चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती मोमीन यांच्यासमोर घेण्यात आली. यावेळी ॲड. सुनील गुरव यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना अनेक मुद्दे उपस्थित करत पंकज खेडेकर हे स्थानिक असून, ते प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते येथे कायमस्वरूपी वास्तव्य करणारे आहेत. तपासाच्या बाबतीत ते कोणताही हस्तक्षेप करणार नाहीत. पूर्ण सहकार्य करतील, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायमूर्ती मोमीन यांनी पंकज रजनीकांत खेडेकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला. यावेळी प्रत्येक गुरुवारी पोलीस स्थानकात हजर राहण्याचे व तपासकामी पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.