राजापूर : आजूबाजूच्या परिसरातील जनता पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत असताना ओणी-कोंडवाडी येथे तालुक्यातील बहुतांश भाग भीषण पाणीटंचाईने ग्रासण्याची लक्षणे दिसत आहेत. मात्र, ओणी-कोंडवाडीमध्ये खोदण्यात आलेल्या बोअरला प्रचंड पाणीसाठा लागला असून, नजीकचा मळा काही क्षणातच जलमय झाला आणि तेथे उपस्थित असणारे लोक आश्चर्यचकीत झाले. एकीकडे पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असतानाच फक्त १९० फुटावरच एवढा पाणीसाठा मिळाला आहे.ओणी - कोंडवाडी येथील ग्रामस्थ श्रीकांत राजाराम करंबेळकर यांच्यासह परिसराला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि १९० फुट एवढे अंतर खोदाई झाल्यानंतर अचानक जमिनीतून उसळीवर उसळी घेत पाण्याचे प्रचंड फवारे बाहेर पडू लागले. स्वच्छ दिसणारे पाणी पाहून तेथे उपस्थित असणारे करंबेळकर व अन्य मंडळी आश्चर्यचकीत झाली पाण्याचा प्रवाह एवढा वाढला की काही तासातच मळा जलमय झाला. बोअरवेलला तुडुंब पाणी लागल्याची खबर ओणी परिसरात वणव्यासारखी पसरली आणि हा चमत्कार पाहण्यासाठी प्रत्येकाने त्या दिशेने धाव घेतली. तोवर मळ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे बोअर खोदण्यासाठी आलेल्या दोन गाड्या आतमध्ये अडकून पडल्या. कालांतराने अथक प्रयत्नाने त्या गाड्या सुखरुप बाहेर काढण्यात आल्या. मात्र, एवढ्या गतीने हे वाहणारे पाणी थोपवायचे कसे? याच विचाराने तत्काळ प्रयत्न सुरु झाले. प्रथम जमिनीतून उसळी घेत वर येणारे हे पाणी थांबवण्यासाठी खोदण्यात आलेल्या बोअरवेलच्यावर जांभा चिरा ठेवण्यात आला. मात्र, उसळी घेणाऱ्या पाण्याची गती एवढी प्रचंड होती की, काही क्षणातच तो चिरा बाजूला फेकला गेला. त्यानंतर त्यावर पाईप लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोही निष्फळ ठरला. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला रोखण्यात अद्यापही यश आलेले नाही. (प्रतिनिधी)आश्चर्यच!राजापुरातील हॅपी होम बोअरवेलचे मालक प्रकाश कातकर हे १७ वर्षे दक्षिण कोकणासह गोवा प्रांतात बोअरवेलचे काम करतात. त्यांनीच या ठिकाणी बोअरवेल मारण्याचे काम घेतले होते. हा प्रवाह पाहून त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.अचूक अंदाजकळसवली येथील सोनू भानू तरळ हे वयाच्या १५व्या वर्षापासून कुठे पाणी लागेल ते अचूक सांगतात. ओणी-कोंडवाडी येथील ही जागा त्यांनीच दाखवली होती. त्याठिकाणी बोअर खोदताना एवढा प्रचंंड पाणीसाठा लागला आहे.
टंचाईग्रस्त गावात बोअरवेलला धोऽऽधो पाणी
By admin | Updated: April 8, 2015 00:30 IST