मंदिराच्या विद्युतीकरणाचा प्रश्न मार्गी
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे ग्रामदेवतेच्या विद्युतीकरणाची अनेक वर्षांची मागणी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. विद्युतपुरवठ्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र सुर्वे यांनी पाठपुरावा केला होता.
तनवीर काजी यांची निवड
रत्नागिरी : तालुक्यातील मजगाव येथील एहसास वेल्फेअर ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या नूतन अध्यक्षपदी तनवीर काझी यांची निवड करण्यात आली. सचिवपदी रफीक काजी, उपाध्यक्षपदी रियाज मुकादम यांची नियुक्ती झाली. गावातील गरजू महिलांना रोजगारपूरक साहित्य वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले.
नियमबाह्य वाहतूक
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी-जयगड मार्गावर प्रमाणापेक्षा अधिक वजनाची अवजड वाहतूक सुरू आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक लोड भरण्यात येत आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्यास शिवसेनेला आपल्या पध्दतीने प्रश्न हाताळावा लागेल असा इशारा शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिला आहे.
अतिक्रमण विभागाची कारवाई
रत्नागिरी : येथील नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना फळे, भाजीपाला जप्त करण्याऐवजी वजनकाटेच जप्त करण्यात येत आहे. त्यामुळे फेरीवाले आपोआप बाजूला होत असल्याने मार्ग मोकळा होत आहे. माल उचलून नुकसान करण्याऐवजी वजनकाटे जप्त करण्याची युक्ती फायदेशीर ठरत आहे.