दापोली : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्याच्या मधेच कळपाने जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अनेक वेळा जनावरांची झुंज लागत असून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दत्तक-पालक योजना
दापोली : शहरातील ज्ञानदीप विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील पहिली तेे दहावीमध्ये शिकत असलेल्या गरजू, होतकरू व नावीन्यपूर्ण काैशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी संतोषभाई मेहता दत्तक पालक विद्यार्थी योजना सुरू करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
खड्डे भरल्याने समाधान
लांजा : तालुक्यातील कोर्ले-प्रभानवल्ली-खोरनिनको या रस्त्याची चाळण झाली होती. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर खड्डे भरण्यात आले आहेत. मात्र या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
टेबल टेनिस स्पर्धा
खेड : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने टेबल टेनिस असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यातर्फे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ते २७ सप्टेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
विद्युत टाॅवर धोकादायक
चिपळूण : तालुक्यातील टेरव मार्गावरील धामणवणे परिसरात एका उच्च दाब वीजवाहिनी टाॅवरनजीक डोंगरातील माती खचल्याने टाॅवरला धोका निर्माण झाला आहे. हा टाॅवर डोंगराळ भागातील उंच टेकडीवर आहे. टाॅवरच्या पायथ्याखालील भाग खचल्याने खड्डा पडला आहे.
जीवनावश्यक साहित्याचे वाटप
चिपळूण : तालुक्यातील आंबडस प्राथमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त जीवनावश्यक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चिरणी गावातील १५ कातकरी कुटुंबांना साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी आंबडस विद्यालयाचे चेअरमन अशोक निर्मेळ, सरपंच जयंत मोरे उपस्थित होते.