रत्नागिरी : अतिवृष्टी, महापूर या नैसर्गिक संकटांनी बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना वाढीव आर्थिक मदत देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार, जिल्हा प्रशासनातर्फे आपद्ग्रस्तांची यादी नव्याने तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्वांना सुधारित निकषानुसार मदत केली जाणार आहे.
पोलीस पाटील पदे रिक्त
गुहागर : गावातील कायदा आणि सुव्यवस्था यांची जबाबदारी असलेल्या पोलीस पाटलांची पदे गुहागर तालुक्यात निम्म्याहून अधिक रिक्त आहेत. त्यामुळे काही ठिकाणी एका पोलीस पाटलावर दोन ते तीन गावांचा कार्यभार देण्यात आला आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
प्लॅस्टिक ध्वजावर बंदी
रत्नागिरी : ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाच्या प्लॅस्टिक कागदी प्रतिकृती वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लॅस्टिक कागदी ध्वज वापरणारे नागरिक, विद्यार्थी, उत्पादक, विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी संस्था यांनी ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नातेवाइकांसाठी विश्रांती
रत्नागिरी : सिव्हिलमध्ये उपचारासाठी येणा-या सामान्य रुग्णांच्या नातेवाइकांसाठी विश्रांतीगृहाची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून एक कोटी दोन लाख ५३ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय दूर होणार आहे.
मोरोशीत इंटरनेट सेवा ठप्प
राजापूर : कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. परंतु, काही गावांमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तालुक्यातील मोरोशी गावातील विद्यार्थ्यांनाही याचा सामना करावा लागत आहे. नेटवर्कच नसल्याने या मुलांना अभ्यासासाठी इतरत्र नेटवर्क शोधत फिरावे लागत आहे.