रत्नागिरी : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सैतवडे गावातील सर्व एस. टी. गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, बंद झालेल्या गाड्या आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या बंद केलेल्या गाड्या नियमित करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सैतवडे गावात जाणाऱ्या गाड्या पेठ मोहल्लापर्यंत सोडण्यात याव्यात. त्यामुळे या भागातील व आजूबाजूच्या परिसरातील मच्छीमार समाज तसेच कामासाठी ये-जा करणाऱ्यांसाठी सोईस्कर ठरणार आहे. शिवाय एस. टी.च्या उत्पन्नातही वाढ होईल.
माजी पोलीस पाटील इब्राहिम मुल्ला, जमीर खलफे व इरफान शेकासन यांनी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गाड्या पूर्ववत करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन मेहतर यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी पेठ मोहल्ल्यापर्यंत एस. टी. गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले. लवकरच एस. टी.च्या फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.