रत्नागिरी : जिल्ह्यासह महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने ३ ते ९ जून या कालावधीत लाॅकडाऊन आणखी कडक केले होते. मात्र, तरीही रुग्णवाढ कमी झालेली नाही. उलट वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ८ हजारपेक्षा रुग्णसंख्या वाढली आहे. एप्रिल-मे महिन्यापेक्षाही जून महिन्यात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येचा आलेख उंचावणार, अशी शक्यता वाटू लागली आहे.
कोरोनाच्या संख्येत शिमगोत्सव झाल्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातही १५ एप्रिलनंतर आठवड्याचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. तरीही संख्या आटोक्यात न आल्याने पुढे तो सात दिवसांचा आणि त्यानंतर पंधरा दिवसांचा करण्यात आला. १५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत लाॅकडाऊन करूनही जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी न होता वाढू लागला. त्यामुळे एप्रिल अखेर जिल्ह्यातील या महिन्यातच रुग्णसंख्या ११ हजार २५४ इतकी झाली, तर एकूण संख्या २२ हजार २८३ झाली. उलट १५ एप्रिलनंतर दरदिवशी सापडलेल्या रुग्णांची संख्या ५०० पेक्षा जास्त झाली आणि अगदी ७९१ पर्यंत पाेहोचली. एकूण मृत्यूंची संख्या ६५६ होती.
लाॅकडाऊन वाढले, तरीही संख्येचा आलेख खाली न येता अधिकच वाढला. लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील दुकानेच केवळ सुरू होती. मात्र, तरीही १ ते ३१ मे या महिनाभराच्या कालावधीत १४ हजार १५६ रुग्ण जिल्ह्यात वाढले, तर एकूण मृत्यूचा आकडा १,२३९ (३.४० टक्के) वर पोहोचला.
जून महिन्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही, हे लक्षात येताच, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ३ ते ९ जून या कालावधीत लाॅकडाऊन अधिक कडक केले. त्यामुळे दूध आणि औषधे वगळून इतर सर्वच अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या, तसेच कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे या कालावधीत अधिकाधिक रुग्ण सापडणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू का होईना कमी होईल, असे वाटत हाेते.
मात्र, आता १५ जून उजाडले, तरीही जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी न होता अधिकच वाढली आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत दररोज ३८९ ते अगदी ५९२ पर्यंत रुग्ण बाधित होत आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर यात कुठेही रुग्णवाढ कुठेही आटोक्यात आलेली दिसत नाही.
चाचण्या वाढल्या, पण...
आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असली, तरी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अतिवेगाने पसरला आहे. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाच्या चाचण्या वाढण्याबरोबरच ग्रामीण भागात अजूनही आजार घरातच लपविला जात आहे. त्यासाठी गावच्या कृती दलाने याबाबत सतर्क राहून दर दिवशीच माहिती घ्यायला हवी. काही गावातील कृती दल आता सक्रिय झाल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात काही अंशी त्यांना यश मिळत आहे.
महिना रुग्णवाढ मृत्यू
एप्रिल ११,२५४ २८०
मे १४,१५६ ५८३
१ ते १४ जून ७,७४७ २९५
आतापर्यंत ४४,६४९ १५३४
१ ते १५ जून या दरम्यानची रुग्णसंख्या
१ ६५५
२ ६१०
३ ३८९
४ ५९०
५ ५८२
६ ५६७
७ ४२९
८ ५६७
९ ५२५
१० ५३८
११ ६९३
१२ ४२६
१३ ५८४
१४ ५९२