शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रात आता कासव संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. त्यामुळे २०१६-१७ सालापासून कासवांच्या संवर्धनात वनविभागाला स्थानिकांचा सहभाग मिळत आहे. किनाऱ्यांवर कासवमित्र नियुक्त केल्याने कासवांच्या अंड्यांचे जतन आणि संवर्धन हाेण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच गेल्या नऊ वर्षांत या परिक्षेत्रात ५०५ घरट्यांमध्ये जतन केलेल्या ५२,३७३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या २२,०६१ पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत.सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने २००२ सालापासून रत्नागिरी जिल्ह्यात कासवांच्या जतन मोहिमेला सुरुवात केली. त्यामुळे वनविभागाच्या मोहिमेला या संस्थेचे महत्त्वाचे योगदान मिळाले. कासवप्रेमी, तसेच स्थानिक लोकांचा कासवांच्या संवर्धनात सहभाग वाढल्याने कासवांच्या अंड्यांचे संवर्धन मोठ्या संख्येने होऊ लागले. कासवांना रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे अंड्यांसाठी सुरक्षित वाटू लागले आहेत. त्यामुळे कासवांच्या घरट्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. विशेषत: मालगुंड आणि गावखडी या दोन किनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांची व अंड्यांची संख्या लक्षणीय आहे.वन विभागाने २०१६ - १७ रत्नागिरी परिक्षेत्रातील राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांमधील वाडावेत्ये, माडबन, गावखडी, मालगुंड व भाट्ये या पाच समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांच्या संवर्धनाची मोहीम ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केली. त्यासाठी किनाऱ्यांवर कासवमित्रांची नियुक्तीही करण्यात आली आहे.२०२३-२४ पासून कासव संवर्धनाची जबाबदारी वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे देण्यात आली आहे. रत्नागिरी परिक्षेत्रातील गावांमध्ये कासवांच्या संवर्धनाबाबत वनविभागाकडून, तसेच माध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे या पाच किनाऱ्यांवर स्थानिकांचे योगदान संवर्धनात महत्त्वाचे ठरत आहे.किनाऱ्यांवर संवर्धन२०२०-२१ मध्ये संवर्धित केलेल्या माडबन, गावखडी आणि वाडावेत्ये या तीन किनाऱ्यांवर २६ घरटी सापडली. त्यातील संवर्धित केलेल्या २,८२३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या ८,९७१ पिलांना समुद्रात सोडण्यात आले. त्यानंतर, २०२१ सालापासून मालगुंड, गणपतीपुळे, गणेशगुळे, कुर्ली, काळबादेवी, उंडी, आडे, भाट्ये आदी किनाऱ्यांवरही कासवे अंडी घालण्यासाठी येत आहेत.
कासव संवर्धन आणि संरक्षण: नऊ वर्षांत २२ हजार पिले मुक्त विहारासाठी समुद्राकडे
By शोभना कांबळे | Updated: May 13, 2025 19:12 IST