रत्नागिरी : रत्नागिरी शहर छोटे असूनसुध्दा सर्वार्थाने विकसित होत असलेले दिसून येत आहे. मोठ्या शहरात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत असतानाही राज्यात रत्नागिरीच्या विद्यार्थिनीने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. त्यामुळे लातूर पॅटर्नऐवजी कोकण पॅटर्न विकसित होत असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.रत्नागिरी नगर परिषदेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी खासदार राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, विधानसभा संपर्कप्रमुख वर्षा पितळे, शहरप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख वीणा रेडीज, उपशहर प्रमुख प्रशांत साळुंखे, पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश साळवी, मनीषा बामणे, उपनगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेवक उमेश शेट्ये आदी उपस्थित होते. नगरपरिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेतही नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिध्द केली असल्याचे प्रतिपादन बाळ माने यांनी केले. या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चिन्मयी मटांगे हिचा सत्कार खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऋग्वेद कोकजे, गौरी झोरे, कुणाल कळंबटे, अभिषेक कांबळे, नीलेश हातणे, धनश्री पाटील, अतुल भाटकर, प्राची उमक यांच्यासह एमटीएस, चौथी, सातवीतील शिष्यवृत्तीधारक, दहावी, बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
कोकण पॅटर्नचा राज्यात ठसा : राऊत
By admin | Updated: August 24, 2014 22:35 IST