पावस परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते. (छाया : दिनेश कदम)
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जलजीवन मिशन योजनेंतर्गत वाडी-वस्त्यांवर नळपाणी योजना करून प्रत्येकाला घरपोच पाणी पुरवण्यासाठी पावससाठी योजना तयार करा. पावस हे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी सुसज्य असे विश्रामगृह बांधण्यासाठी निधी दिला जाईल. पावसच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पावस येथे दिले.
पावस, गोळप, कोळंबे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाले. या उद्घाटनावेळी ते बाेलत हाेते. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, प्रमोद शेरे उपस्थित होते.
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमअंतर्गत पावस येथील श्री स्वामी स्वरुपानंद मंदिर मुख्य रस्ता ते जुईवाडी, पाटीलवाडी, बळगेवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, श्री स्वामी स्वरुपानंद मंदिर मुख्य रस्ता ते नालेवठार रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, पावस येथील श्री स्वामी स्वरुपानंद जन्मस्थान ते काटेवाडी-भाटीवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामांचे भूमिपूजन उदय सामंत यांच्याहस्ते झाले.
तसेच गोळप येथे गोळप वडपिंपळ स्टॉप ते सत्येवाडी सत्येश्वर मंदिर स्टॉप रस्ता डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन तसेच रनपार राडयेवाडी ते फिनोलेक्स फाटा रस्ता डांबरीकरण करणे या कामांचे तसेच वायंगणी भोवडवाडी नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले.