दापोली : तालुक्यात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला काेराेना प्रतिबंध नियमांचे पालन करत भक्तगणांनी मोठ्या जड अंतकरणाने निरोप दिला.
गणेश विसर्जनासाठी दापाेली शहरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली हाेती. तसेच तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींनी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. तालुक्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नसून विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुका, ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे साध्या पद्धतीने परंतु भक्तिभावे गणरायाला निरोप देण्यात आला. या वर्षी समुद्र, खाडी किंवा नैसर्गिक नदी नाल्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये अशा प्रकारच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक भक्तगणांनी घरच्या घरी किंवा नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करण्याला पसंती दिली हाेती.