नारळाची मागणी वाढली
रत्नागिरी : कोकणात नारळाचा सर्वाधिक वापर केला जातो. प्रत्येक सणाला नारळ महत्त्वाचा असतो. गणेशोत्सव कालावधीत नारळाच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने त्याचे दरही वधारलेले आहेत. नेहमीच्या मागणीपेक्षा सध्या तीन ते चार पटीने नारळाचा दर वाढला आहे. बाजारात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातून नारळाची आवक होत आहे.
शेंबेकर यांचा सत्कार
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील खेर्डीचे सुपुत्र समर्थ भक्त रमेश शेंबेकर यांची श्री समर्थ विद्यापीठ सातारा या ठिकाणी कुलगुरुपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्त चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आणि खेर्डीच्या सरपंच वृंदा दाते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. खेर्डी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात त्यांना गौरविण्यात आले.
किनाऱ्यावर तेलाचा तवंग
दापोली : तालुक्यातील दाभोळ ते केळशी या ५० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आॅईलचा तवंग आला आहे. त्यामुळे समुद्रकिनारा पूर्णपणे काळवंडला आहे. किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांना या तवंगापासून धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खडपोलकर यांची निवड
चिपळूण : तालुक्यातील खडपोली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी तन्वीर खडपोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. खडपोलीचे माजी सरपंच इसा खडपोलकर यांचे तन्वीर खडपोलकर हे चिरंजीव आहेत. सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात.