चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील सर्व्हे नं. ६९११/१२/१३/१५ या जागेमध्ये बांधण्यात आलेली इमारत गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे. या इमारतीतील काही सदनिकांमध्ये रहिवासी वास्तव्यास असून, इमारत अपूर्ण असल्यामुळे विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी १५ रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. शिवाजीनगर येथे बांधण्यात आलेल्या इमारत ठेकेदाराचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. मात्र, इमारतीचे कामही अपूर्ण स्थितीत आहे. संबंधित ठेकेदाराने बांधकाम नकाशाप्रमाणे केले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. याबाबत तत्कालिन मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी १९ मे २०११ रोजी संबंधित ठेकेदार यांना काम अपूर्ण असल्याचे पत्र दिले होते. मात्र, त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे इमारतीतील सदनिकाधारक जीव मुठीत धरुन राहात आहेत. विविध गैरसोयी येथे भेडसावत आहेत, असे ईश्वर गुरव यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर मुख्याधिकारी यांच्याकडे बोट दाखवले जाते. मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना निवेदन सादर केल्यानंतर कारवाई करतो, असे आश्वासन देऊन वेळ मारुन नेली जाते. सातत्याने आजतागायत तोंडी व लेखी पत्र व्यवहार करुनही दुर्लक्ष होत आहे. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ही सदनिका व इमारत धोकादायक आहे. त्यामुळे ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या पुन्हा निदर्शनास येण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ईश्वर गुरव, शशिकला गुरव व अन्य सदनिकाधारकांनी दिला आहे. (वार्ताहर)
धोकादायक इमारत दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By admin | Updated: August 12, 2014 23:21 IST