रत्नागिरी - अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव याबरोबरच टीव्हीसमोर बसून खाणे, जेवणे यामुळे सध्या अनेक जणांना पोटाच्या विकारांनी त्रस्त केले आहे. सध्याची मुले टीव्हीसमोर बसल्याशिवाय जेवतच नाहीत, अशा तक्रारी त्यांच्या आईकडून ऐकायला येत आहेत.
सध्याची बदलती जीवनशैली, आहारशैली आणि मानसिक ताणतणाव याचा परिणाम व्यक्तीच्या पचनसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुर्वीचे घरगुती पाैष्टिक अन्न, फळे, भाज्या या दुर्मीळ झाल्या आहेत. तसेच भेसळयुक्त खाणे खावे लागत आहे. त्यातच पाणीही अशुद्ध झाले आहे. नोकरी - व्यवसायानिमित्त बाहेर गेल्यावर बाहेरचे खाणे खावे लागते. त्यातच सध्या फास्ट फूड, जंक फूड खाणे, मात्र, शरीराची हालचाल न होता एकाच जागेवर दीर्घ काळ काम करत रहाणे, टीव्हीसमोर तासनतास बसून जेवणे या सर्व कारणांमुळे व्यक्तीची संपूर्ण पचनसंस्थाच बिघडू लागल्याने वजन, चरबी, मधुमेह आदी आजारांबरोबरच पोटांचेही विकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
पाेटविकाराची प्रमुख कारणे
दूषित पाणी, अनियमित आणि असंतुलित आहार, ताणतणाव ही पोटविकार वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर दूषित पाण्याचे सेवन केल्यास जंतूसंसर्ग होऊनही पोट दुखणे, आतड्याला सूज येणे, मल विसर्जनात अडथळा, अनियमितता उद्भवणे आदी अनेक प्रकारचे त्रास निर्माण होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पोटविकारांच्या कारणांमध्ये महत्त्वाचे आणखी एक कारण म्हणजे बहुतांश व्यक्ती, विशेषत: मुले यांना टीव्हीसमोर बसून खाण्याची किंवा जेवणाची सवय असते. त्यामुळे आपण किती खातो, हे लक्षात येत नाही. यामुळे वजन वाढणे, मधुमेह, चरबी वाढणे यासारखे विकार होत आहेत. या कारणांमुळे पोटाचे विकार प्रकर्षाने वाढले आहेत.
असंतुलित आणि अनियमित आहार ही दोन महत्त्वाची कारणे पोटाच्या समस्या वाढवितात. त्यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात. त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशुद्ध पिण्याचे पाणीही पोटविकाराचे कारण ठरते. काहींच्या बैठ्या कामामुळेही अपचनाची समस्या निर्माण होते. सध्या पोटाचे विकार वाढविणारे महत्त्वाचे कारण म्हणजे टीव्ही बघत जेवणे. यामुळेही पचन नीट न होण्याची समस्या उद्भवते.
- डाॅ. मनोज मणचेकर, सर्जन, रत्नागिरी
सध्याच्या आहारात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. जीवनशैलीत बदल झाल्याने काही वेळा बाहेरचे खाणे याचाही पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर सध्या बाहेरचे खाणेही वाढले आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही घरगुती पचायला हलका असा साधा आहार घेण्यापेक्षा जंक फूड, फास्ट फूड घरगुती जेवणापेक्षा अधिक आवडू लागले आहे. टीव्हीसमोर तासन् तास बसून कार्यक्रम बघतच जेवणे, यामुळे पोटात काय जातेय, हेही कळत नाही. पोटाचे त्रास वाढविणारे हे प्रमुख कारण आहे.
- डाॅ. रवींद्र गोंधळेकर, पोट विकार तज्ज्ञ, रत्नागिरी
काय म्हणतात महिला...पाेटविकार टाळायचे असतील तर...
वेळेवर आणि संतुलित आहार घ्या. जास्तीत जास्त घरगुती पदार्थ खाण्यावर भर द्या. फास्ट फूड, जंक फूड टाळा. अवेळी खाणे टाळा.
बाहेर असाल तर स्वच्छ जागा आणि आहार असल्याची खात्री करा. ताण दूर करण्यासाठी याेगासने, प्राणायाम करा. जागरण टाळा. पिण्याचे पाणी शुद्ध हवे.
जेवताना टीव्ही पूर्णपणे बंद ठेवा. मुलांनाही टीव्हीसमोर बसून जेवण्याची सवय लावू नका. एका ठिकाणी दीर्घ काळ बसू नका.
काय म्हणतात महिला...
मुलांना टीव्हीची सवय लागल्याने त्यांचा खेळही थांबला आहे. टीव्हीमुळे त्यांना जेवणाची आठवणही नसते. टीव्ही बंद असेल तर जेवणाला असहकार असतो. त्यामुळे टीव्ही बघ पण जेव असे नाईलाजाने म्हणावे लागते.
- मानसी साळवी , रत्नागिरी
खरेतर टीव्ही बघत खाणे, हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण काही वेळा नाईलाज असतो. दटावण्याचाही काही उपयोग होत नाही. त्यामुळे मुलीला जेवण्यासाठी नाईलाजाने टीव्ही लावून द्यावा लागतो.
- निधी मुसळे, रत्नागिरी
मुलांना जेवताना टीव्ही लागतो. नाही लावला तर जेवणारच नाही, असे इमोशनली ब्लॅकमेल करण्याचे मोठे हत्यार उगारतात. त्यामुळे किमान टीव्हीसमोर बसून तरी जेवेल, असा विचार करून अखेर मग नाईलाजानेच मुलीला टीव्ही लावून द्यावा लागतो.
-शगुफ्ता नाकाडे, नेवरे, रत्नागिरी