- प्रवाशांना टेबल सर्व्हिस
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेवून, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टाॅरंटना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करून फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे, तसेच हॉटेलच्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही. त्याचप्रमाणे सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे.
या अनुषंगाने २५ मे रोजी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अचानक रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील हॉटेल वृंदावनला भेट दिली. त्यावेळी हे हॉटेल सुरू असल्याचे व एका आराम बसमधील प्रवासी हे टेबल सर्व्हिस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दीही दिसली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रत्नागिरीचे तहसीलदार, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत या हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हॉटेलमध्ये टेबल सर्व्हिस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लंघन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तत्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यंत सीलबंद केले, तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल आस्थापनावर १३ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.
हॉटेल सील करण्याच्या कारवाईत तहसीलदार शशिकांत जाधव यांच्यासोबत पालीचे मंडल अधिकारी सुरेंद्र कांबळे, रत्नागिरीचे मंडल अधिकारी विलास सरफरे, तलाठी अरविंद शिंदे, महसूल सहायक रवी खाके व कोतवाल डिचोलकर यांनी सहभाग घेतला. दंडात्मक कारवाई अन्न व औषध विभागाचे निरीक्षक पाचपुते प्रशासन यांच्या पथकाने केली.
------------------------
आरामबसवरही कारवाई
मुंबईला जाणारी एक आरामबस काही प्रवाशांसह उभी होती. या आरामबसवर उपप्रादेशिक अधिकारी व पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात आली.
------------------
सर्व हॉटेल व रेस्टॉरंट यांनी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच फक्त घरपोच सेवा द्यावयाची आहे. तसेच हॉटेल सेवापुरवठादार/डिलीव्हरी बॉय/इतरांनी कोरोना चाचणी (जास्तीत जास्त १० दिवस अलिकडील) निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे.
- शशिकांत जाधव, तहसीलदार, रत्नागिरी.
-------------------------