फुणगूस : जंगलतोड आणि वाढत्या तापमानामुळे येथील वनौषधींचा ऱ्हास होत आहे. आरोग्यासाठी वरदान ठरलेल्या या वनौषधींची मागणी एकीकडे वाढत असताना त्या दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालल्याचे चित्र आहे. वनौषधी संवर्धनाबाबत शासन आणि कृ षी विभागाने फारशी जागरुकता न दाखवल्याने हा वनसंपत्तीचा ठेवा नष्ट होत आहे. त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. जिल्ह्याला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. येथील जंगली वनस्पती जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आंबा, काजू, फणस, रातांबी, जांभूळ, साग, खैर, पळस आदी वृक्षांबरोबरच अनेक दुर्मीळ झाडे येथे आढळतात. कुडा, आघाडा, बेहडा, त्रिफळा, नागकेशर, हिरडा, धोत्रा, कोरफड आदी असंख्य प्रकारच्या वनौषधी जंगली प्रदेशात आढळत आहेत. या वनौषधीपासून घरगुती औषधे बनवून त्यापासून रुग्णांवर उपचार करण्याचे काम ग्रामीण भागातील वैद्य मंडळी करत असत. अनेक असाध्य रोगांवर ही औषधे रामबाण ठरत असल्याने डॉक्टरांपेक्षाही वैद्याकडून इलाज करुन घेण्यात धन्यता मानणारे लोक आजही दिसून येतात.अॅलोपॅथीमध्येही वनौषधींचा वापर होत असल्याने त्यांना देशाबरोबर परदेशातही मागणी असते. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांची असंख्य प्रकारची औषधे बाजारात येत आहेत. या सर्वांमध्ये येथील वनौषधींचा वापर झालेला असतो. काही वनौषधींचा वापर केवळ वनौषधीसाठीच होत नसून भाजीसाठीही होतो. त्यामुळे खवय्यांची गरज म्हणूनही या वनौषधींची तोड केली जाते. त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीतही त्या महत्त्वपूर्ण असल्याने कंपन्यांबरोबरच महिलावर्गातही त्यांना मागणी असते.गरज भागवण्यासाठी या औषधींची केवळ तोड होत असून, लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केले नाही तर या वनौषधी पूर्णपणे नामशेष होतील. त्यांच्या लागवडीसाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येत आहे. या भागात जंगलामध्ये दुर्मीळ वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, त्याचे संवर्धन होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने यात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)
कोकणातील वनौषधी होत आहे दुर्मीळ...
By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST