रत्नागिरी : महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीसमोरील समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी, महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बैठक झाली. शिक्षणमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. काँग्रेस आघाडीच्या शासनकाळात मंत्रीमंडळाच्या बैठकीत नवीन ग्रंथालयांच्या मान्यतेला आणि वर्ग बदलाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीसमोर हा विषय ठेवून ही स्थगिती उठवावी लागेल, असे यावेळी सांगण्यात आले. यासाठी याबाबतची टिप्पणी तयार करुन मंत्रीमंडळ बैठकीसमोर ठेवावी, अशा सूचना विनोद तावडे यांनी शिक्षण उपसचिव आणि गं्रथालय संचालक यांना या बैठकीत दिल्या. त्याचबरोबर सार्वजनिक गं्रथालय सेवकांना सध्या वेतनश्रेणी देता येणे शक्य नाही. परंतु, अनुदान वाढीबाबतचा अहवाल तयार करण्याच्या सूचना तसेच ग्रंथालय सेवकांचे वेतन परस्पर त्यांच्या बँक खात्यात कसे जमा होईल, याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश विनोद तावडे यांनी या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिले. नजीकच्या काळात राज्य ग्रंथालय परिषदेची पुन:स्थापना होणार असून, यामुळे अनेक निर्णय मार्गी लागतील, असे विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. त्यामध्ये शताब्दी ग्रंथालयाचे विशेष अनुदान हा महत्वाचा मुद्दाही निकालात निघेल, असा आशावाद व्यक्त केला. ग्रंथालय सेवकांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करता येईल का? आणि शासकीय निवृत्तीवेतन योजनेत ग्रंथालय सेवकांना सामावून घेऊन त्यांच्या निवृत्तीवेतन योजनेचे हप्ते महाराष्ट्र शासनाकडून भरण्याबाबत अहवाल देण्याच्या सूचनाही तावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्र शासनाचा ‘ग्रंथमित्र पुरस्कार’ मिळालेल्या ग्रंथालयांना महाराष्ट्र शासनाच्या सवलती मिळण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजुरीसाठी गेला असून, त्यालाही नजिकच्या काळात मंजुरी मिळेल, अशी आशा वर्तवली. खूप दिवस प्रलंबित असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने या बैठकीद्वारे वाटचाल सुरू झाली आहे. या बैठकीला रत्नागिरीतीलही काही प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनेक समस्या वर्षोनुवर्षे प्रलंबित आहेत. या समस्या न सोडविल्याने गं्रथालय चळवळीसमोर अडचणी निर्माण होत आहेत. या समस्यांबाबत शिक्षणमंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.सार्वजनिक ग्रंथालयाच्या वाटचालीबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, तावडे यांनी अनेक समस्यांबाबत तत्काळ आदेश देऊन ग्रंथालय संघाच्या वाटचालीस हातभार लावल्याचे दिसत आहे.सार्वजनिक ग्रंथालयाच्या वाटचालीत येणाऱ्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये नवीन गं्रथालयांच्या मान्यतेला परवानगी देण्याचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल असे सांगण्यात आले. नवीन ग्रंथालयाच्या मान्यतेला आघाडी सरकारने स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवूनच निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.
सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या सुटण्याची आशा
By admin | Updated: July 23, 2016 00:22 IST