रत्नागिरी : काव्य, नाट्य, संगीत, नृत्य याद्वारे विं. दा. करंदीकर यांचा काव्यप्रवास प्रा. विजया पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी समस्त रत्नागिरीकरांसमोर उलगडला. गुंजन पाटील यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. नगर वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्य, नृत्य, संगीत नाट्यस्पर्शी विं. दा. दर्शन कार्यक्रम प्रा. विजया पाटील, अनिरुद्ध पाटील, गुंजन पाटील, एम. पी. पाटील यांनी सादर केला. वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. ‘नमन कविवरा विस्मयकारा...’ ही नांदी पाटील कुटुंबीयांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी विंदाची स्वप्नांची बाग बालकविता सादर केली. ‘तळ्यात होता बेडूक’, ‘एका माकडाने काढले दुकान’ तसेच बकासुराची आदी बालकविता सादर करण्यात आल्या. सूत्रधार, नटी, विदूषक व पारंपरिक व्यक्तिरेखांबरोबरच कविवर्यांबद्दल बोलणारा प्रवक्ता तसेच कवीमित्र, कवितांचा आस्वाद घेणारी रसिक, समीक्षक, त्यांच्या संसारी जीवनाबद्दल बोलणारी पत्नी, त्यांच्या काहिशा विक्षिप्त परंतु उदारवादी वडिलांबद्दल बोलणारा एक कोकणी भटजी आणि गाणारी व नाचणारी मुले आदी दहा ते बारा व्यक्तिरेखा सादर करून पाटील कुटुंबीयांनी विंदांच्या आठवणी जाग्या केल्या. एकदा काय झाले... पक्षी उडून गेले, म्हणून झाड उडून गेले’, ‘चाफ्याभोवती नाचा गं... पानावरचं वाचा गं...’ या कवितेबरोबर क्रांतिकारी कविता ‘जनतेच्या पोटात आग आहे...’ सादर करण्यात आली. हार्मोनियम साथ आशिष पाटील यांनी तर तबलासाथ अमोल जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘विंदा दर्शना’तून उलगडला कविवर्यांचा इतिहास
By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST