लांजा तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक गढीची शिवगंध प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता करण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा :
लांजा येथील शिवगंध प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील साटवली येथील शिवकालीन गढीची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आल्याने शिवकालीन साटवली येथील गढीने अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
लांजा तालुक्याच्या पश्चिम भागात साटवली येथे शिवकालीन गढी (बंदर) आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात या ठिकाणी साटवली नदीतून गलबतातून येणारा माल साटवली गढी याठिकाणी साठवला जात असे. यामुळेच या गढीला ‘साटवली’ असे नाव पडल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. मात्र, काळाच्या ओघात या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केले गेले नसल्याने या गढीची पार दुरवस्था झाली होती. वाढलेले गवत, झाडेझुडपे, पालापाचोळा यांनी ही गढी आच्छादून गेल्याने तिचे पूर्ण रूपच पालटून गेले होते. गढीची असलेली दुरवस्था पाहून शिवगंध प्रतिष्ठान व दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन गाढीची स्वच्छता मोहीम हाती घेतली.
मोहिमेंतर्गत गढीच्या अंतर्गत भागात वाढलेली झाडेझुडपे, काटेरी झुडपे तोडण्यात आली. तसेच त्या गढीच्या अंतर्गत असलेल्या काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र जमा करून टाकण्यात आल्या. या स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेत शिवगंध प्रतिष्ठानचे अविनाश ऊर्फ राजू जाधव, अंकिता जाधव यांच्यासह अनुष्का जाधव, महेश सावंत, जयेश पत्याने, प्रल्हाद साळुंखे, सिद्धेश मेस्त्री, अरसलान बोंबलाई, राकेश इंदुलकर, स्वप्नील गायकवाड, दयानंद सुर्वे, प्रवीण खानविलकर, निखिल गांधी, निकिता कुरूप, आदित्य कांबळे, आराध्य सावंत, विशाल कांबळे, हर्ष जाधव, मोहन तोडकरी, आनंद शेरे, ओमकार गांगण हे सहभागी झाले होते.