रत्नागिरी जेलमधून पळून जाण्याचा प्लॅन सराईत चोरटा किरण मोरेने आखला. पळून जाण्याआधी दहा कैद्यांना घेऊन जाण्याचा प्लॅन फसल्याने दापोली तालुक्यातील आंबवली येथील बलात्काराची शिक्षा भोगणाऱ्या रितेश कदमला सोबत घेऊन पळाला. मात्र, अवघ्या आठ दिवसांत दापोलीचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरण मोरेच्या पत्नीवर पाळत ठेवली. त्यानंतर मोबाईलचा धागा पकडून आरोपीला पनवेल येथे नाट्यमयरित्या पकडले.किरण मोरे व रितेश कदम दोघेही वेगवेगळ्या गुन्ह्यात रत्नागिरी जेलमध्ये शिक्षा भोगत होते. तेथेच त्यांची ओळख झाली. किरण मोरे हा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी, तर रितेश कदम हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी. रितेश हा जेलमधील बारीकसारीक कामे करत होता. त्यामुळे मुख्य दरवाजाची चावी कुठे असते, याची पूर्ण कल्पना त्याला होती. चावी काढून घेऊन पळून जाण्याचा १० जणांचा बेत किरण मोरेने आखला होता. मात्र, ऐनवेळी अन्य साथीदारानी साथ न दिल्याने दोघेच पळून गेले. पळाल्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली. परंतु गुन्हेगार कितीही चलाख असला तरी नकळतपणे तो एकतरी चूक करतोच. सबूत सोडतो, असे म्हणतात. त्याप्रमाणे किरण मोरेने पत्नीला फोन करण्याची चूक केली. ती एकच चूक महागात पडली. पत्नी व मुलांच्या काळजीने तो पत्नीला नक्की फोन करेल किंवा तिला भेटायला येईल, याची पूर्ण कल्पना पोलिसांना होती. त्यावरुन पोलिसांनी किरण मोरेच्या पत्नीवर पाळत ठेवली. पत्नी कुठे जाते, कोणाला भेटते, काय बोलते या सर्व बाबींवर पाळत ठेवून दापोली पोलीस दिवस-रात्र तिच्यावर नजर ठेवून होते. यापूर्वी किरण मोरे घराशेजारील जंगलात ७ दिवस राहून गेल्याचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले. यावरुन पोलिसांनी साध्या वेशभूषेत घराशेजारी पाळत ठेवली होती. किरण मोरेची बायको पळून जाणार नाही, यासाठी पोलीस २४ तास लक्ष ठेवून होते. २९ जुलै रोजी त्याने पत्नीला मुंबईला भेटायला बोलावले व तेथेच बेत फसला.मोबाईलवरील संभाषणामुळे पोलीस सतर्क झाले. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी निवडक साथीदारांना सोबत घेतले. वारकऱ्यांच्या वेशभूषेत खेड रेल्वेने पनवेल गाठले. मोरेची पत्नी मुलांना घेऊन त्याला भेटायला गेली. पनवेल प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली. सांगितल्याप्रमाणे त्याची पत्नी बाकड्यावर जाऊन बसली. सोबत कुणी नसल्याची खात्री किरण मोरेने करुन घेतली. मात्र, पोलीस वारकऱ्याच्या वेशभूषेत दबा धरुन बसले होते. योग्य वेळेची वाट पाहात होते. पत्नी व मुलांना भेटण्याचा योग साधून किरण पुढे आला. पत्नीला भेटणार तेवढ्यात साध्या वेशातील पोलीस उदय भोसले यांना मोरे याने ओळखले व तो रेल्वे ट्रॅकवरुन पळत सुटला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन रितेश कदम पळाला. परंतु सोबत पैसे नाहीत. त्यामुळे त्याने थेट आंबवली गाठली. पनवेलमधून पळालेल्या दुसऱ्या दिवशी आंजर्ले येथे नातेवाइकांकडे राहिल्याची खबर पोलिसांना लागली. तीन दिवसांनी पोलीस निरीक्षकांनी आंबवली येथे जाऊन रितेशच्या वडिलांकडे चौकशी केली. मात्र, वडिलांनी काही माहीत नसल्याचे सांगितले. रितेश हा रत्नागिरी जेलमध्ये आहे. आपल्याला तो पळाल्याचे माहीत नाही, असे भासवले व तो संपर्कात असल्याची खात्री पटली. पोलीस निरीक्षकांनी त्याच्या घराला खिडक्या किती, दारे किती याची संपूर्ण पाहणी करुन प्लॅन आखला. तो दिवसभर जंगलात राहून रात्री घरीच झोपत असल्याचा संशय मकेश्वर यांना आला. त्यांनी एक दिवशी रात्री दोन वाजता रितेश ज्या खिडकीने आत शिरायचा व घरात झोपायचा त्या खोलीत प्रवेश केला. पोलिसांनी सर्व बाजूंनी बॅटऱ्या मारायला सुरुवात केली व त्याचा पळून जाण्याच बेत फसला. दिवसा जंगल व रात्री घरात राहून त्याने काही दिवस पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या.या मोहीमेत सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी मस्के, नवनाथ जगताप, संभाजी यादव, उदय भोसले, मंगेश शिंदे, समेल सुर्वे, शैलेश सावंत-देसाई, गीता म्हापर्ले, मंगेश शिगवण, स्वप्नील शिवलकर, अनुप पाटील, सुनील पवार, विक्रम पाटील, पांडुरंग जौरत, प्रकाश जाधव, विष्णू गिम्हवणेकर, शिवराज दिवाळे, राजू मोहिते, दिवट्या गुजर, भाऊ पाटील, सिद्धे आंब्रे सहभागी झाले होते.- शिवाजी गोरेपोलिसांची कामगिरी...किरण मोरे याने रत्नागिरी जेलमधून पळून जाण्याचा प्लॅन तयार केला. मात्र, हा प्लॅन दापोली पोलिसांनी उधळून लावला. त्याला दापोली पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पनवेल येथे पकडले. हे काम करताना त्यांनी वारकऱ्याच्या वेशात खेड रेल्वेने त्यांनी पनवेल गाठले. मोरेची पत्नी मुलांना घेऊन त्याला भेटायला गेली. पनवेल प्लॅटफार्मवर गाडी थांबली सांगितल्याप्रमाणे सारे काही घडले. मात्र, मोरे याने पोलिसांना ओळखले व तो पळून जात असताना त्याला पकडले. अशा अनेक प्रकारात त्यांनी चांगली कामगिरी करीत चोरट्यांना ताब्यात घेतले. मोबाईलच्या एका धाग्यावरून हा यशस्वी तपास करण्यात आला.
पळण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी मात्र..
By admin | Updated: August 17, 2014 22:34 IST