रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या, विशेषत: कोरोनाचे हाॅटस्पाॅट होऊ लागलेल्या मुंबईतून मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविला आहे. बुधवारी एकाच दिवसात तब्बल २७ हजार ३१२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील १५२ सरकारी केंद्रे आणि ८ खासगी केंद्रांवर लस देण्यात आली. यापैकी पहिला डोस १९,८५९ आणि ७,४५३ जणांना दुसरा डोस देण्यात आला.
जिल्ह्यात सुमारे ११ ते १२ लाख १८ वर्षांवरील आहेत. सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लसचा पुरवठा अपुरा पडू लागल्याने जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत केवळ ३५ ते ४० टक्के इतकेच लसीकरण झाले हाेते. मात्र, ऑगस्ट महिन्यात विशेषत: उत्तरार्धात जिल्ह्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचे डोस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले आहेत.
कोराेनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने लसचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाल्यास दररोज २५ हजार डोसचे वितरण करण्याची तयारी ठेवली होती.
त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने पहिला डोस आणि दुसरा डाेस राहिलेल्यांची प्रतीक्षा हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे.
गेल्या आठ महिन्यात बुधवारी दि. ८ सप्टेंबर) जिल्हयातील १५२ सरकारी आणि ८ खासगी अशा एकूण १६० केंद्रांवर तब्बल २७ हजार ३१२ इतके डोस देण्यात आले. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी योग्य नियोजन केले असून त्यांच्या यंत्रणेच्या साहाय्याने आता लसीकरणाला वेग आला आहे. आतापर्यंत ८ लाख २१ हजार डोस देण्यात आले आहेत. यापैेकी पहिला डोस ५ लाख ७५ हजार तर २ लाख ४६ हजार ४३२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
.....
लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमाबद्दल गुरुवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य समिती सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे काैतुक केले.
...........
जिल्ह्याला आता मुबलक प्रमाणात लस मिळत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने प्रत्येक दिवसाला अधिकाधिक लस देण्याचे नियोजन केले आहे.
डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी
......
आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी
वयोगट पहिला डोस (टक्के) दुसरा डोस (टक्के)
१८ ते ४४ ३३.६४ ६.६७
४५ ते ६० ५६.७१ २८.८२
६० वरील ६१.७७ ३४.९०
१८ वरील ४९.८२ २१.६०