खेड : जुलै महिन्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर व आजूबाजूच्या गावांवर महापुराने मोठे संकट आणले. या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती बाधित झाली असून, त्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावर व खासगी संस्थांमार्फत मदतीचा ओघ आजही सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेल्पिंग हँड आणि वालावलकर रुग्णालयामार्फत चिपळूण तालुक्यातील बाधित क्षेत्रात जवळपास १५ टन धान्याचे वाटप करण्यात आले. त्याचवेळी बाधित क्षेत्रातील अनेकांची आरोग्य तपासणी करून त्याच्यावर औषधोपचारही करण्यात आले.
डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय व हेल्पिंग हँड यांनी कडधान्ये, तांदूळ, पीठ, साखर, तेल पिशव्या आणि खाद्यपदार्थ अशा वस्तू देण्यात आल्या आहेत. चिपळूण व आजूबाजूच्या खेर्डी, उक्ताड, भुरणेवाडी, सती समर्थनगर, शंकरवाडी आदी विभागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्तांसाठी वाटप केले.
पूर ओसरल्यावर साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वालावलकर रुग्णालय डेरवणमार्फत दररोज वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, सामाजिक कार्यकर्ते व रुग्णालयातील इतर कर्मचारी असे तीस जणांचे आरोग्य पथक या प्रभावित भागात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार करत होते. जवळपास १५ -२० दिवस ही आरोग्य तपासणीची मोहीम सुरू होती. संस्थेमार्फत हे कार्य सेवाभावी वृत्तीने करण्यात येत आहे. चिपळूणवासीयांकडून संस्थेच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.