खेड : पुरोगामी शिक्षक संघटनेच्या खेड शाखेतर्फे येथील शिवतेज कोविड सेंटरला व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांची दहा हजार पाकिटे, वीस हजार हॅण्डग्लोव्हज्, वाफेची मशीन, वॉटर फिल्टर आदींची मदत करण्यात आली. आमदार योगेश कदम यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.
वॉच टॉवरचे पत्रे उडाले
दापोली : तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनारी पोहायला जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुरक्षा वॉच टॉवरवरील पत्रे तौक्ते चक्रीवादळात उडून गेले आहेत. टॉवरचीही हानी झाली आहे. या टॉवरवरील पत्रे उडाले असून, शिडी तसेच लोखंडी खांबही नादुरुस्त झाले आहेत.
घरांना धोका
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील औदुंबर बाग रेहेळ भागाडी येथील प्रदीप जंगम यांच्या घराजवळ जेसीबीच्या सहाय्याने मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे जंगम यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. याविषयी त्यांनी चिपळूण तहसीलदारांना निवेदन दिले असून, माती उत्खनन थांबवावे तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मोफत भोजन व्यवस्था
रत्नागिरी : येथील शिवप्रसाद महाजनी फाऊंडेशनने कोरोनाबाधितांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम राबविला आहे. कारवांचीवाडी येथील शिवश्री हॉस्पिटल, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि कुवारबाव कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधितांसाठी फाऊंडेशनतर्फे ही व्यवस्था करण्यात आली आहे.
दुचाकीस्वारांची अॅन्टिजन
दापोली : शहरात विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना चाप बसावा, यासाठी दापोली पोलिसांनी दुचाकीवरुन फिरणाऱ्यांची अॅन्टिजन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला सुरुवात केली असून, काही दिवसांपूर्वी या मोहिमेतून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
ऑनलाईन मार्गदर्शन
दापोली : शेतकऱ्यांमध्ये व्यापारी दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठीचे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी ‘पावसाळी भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान’ यावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता.
कृषी विभागातर्फे जागृती
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील हळद लागवडीचे क्षेत्र वाढावे, यासाठी देवरुख पंचायत समितीच्या कृषी विभागाने व्यापक जनजागृती हाती घेतली आहे. त्यामुळे घर परड्यासह अन्य असलेल्या स्वमालकीच्या जागेत हळदीच्या लागवडीसाठी अनेक शेतकरी पुढे आले आहेत.
विवरण पत्रासंबंधी सूचना
रत्नागिरी : अन्नपदार्थ उत्पादक, रिपॅकर व्यावसायिक यांनी २०२०-२१ या वर्षाचे विवरण पत्र अद्याप भरले नसल्याचे कार्यालयीन अभिलेखा पडताळणीनंतर निदर्शनाला आले आहे. त्यामुळे अशा परवानाधारक अन्नपदार्थ उत्पादकांनी दंडाची रक्कम वाढविण्यापूर्वी लागू असलेल्या दंडासह वार्षिक परतावा ३१ मेपर्यंत सादर करावा, असे कळविण्यात आले आहे.
काळा सप्ताह
रत्नागिरी : शेतकरी, कामगार यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काळा सप्ताह पाळण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार आठवडाभर काळा सप्ताह पाळण्यात येणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन आढावा
खेड : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी खेड येथे आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने उपस्थित होते. मिश्रा यांनी रेल्वे स्थानकावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चालणाऱ्या कामकाजासंबंधीही माहिती करुन घेतली.