देवरुख : मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी करण्यासाठी संगमेश्वर रेल्वे स्थानकात आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. याठिकाणी शनिवारी दुपारपर्यंत २० जणांची ॲंटिजन चाचणी करण्यात आली. या सगळ्या प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे यांनी शनिवारी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. ही तपासणी पोलीस बंदोबस्तात केली जात आहे.
मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचा दुसरा डोस झाला आहे की नाही तसेच त्यांनी तपासणी केली आहे की नाही, याची माहिती घेतली जात आहे. शनिवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी सुरू आहे. यावेळी आरोग्य विभागाचे प्रभारी विस्तार अधिकारी बी. टी. तुळसणकर, कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक संतोष भोसले, आरोग्यसेविका एस. आर. गोसावी, संगमेश्वर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माने, होमगार्ड के. एम. पडवळ उपस्थित होते.