रत्नागिरी : कडवई (संगमेश्वर) येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहाराचा ५२ पोती तांदळाचा अपहार झाल्याचे चौकशीमध्ये उघडकीस आले आहे़ याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून जिल्हा परिषदेकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे़ कडवईतील (संगमेश्वर) भाईशा घोसाळकर हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्यामध्ये भ्रष्टाचार असल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण पुढे आणले होते़ त्यावेळी शाळेतील शिक्षकांचे पगार भागविण्यासाठी शालेय पोषण आहाराचे धान्य विकल्याचा अध्यक्ष चंद्रकांत यळगुडकर यांनी इन्कार केला होता़ एप्रिल, २०१४ मध्ये ग्रामस्थांनी शाळेच्या खोल्यांची तपासणी केली असता एका खोलीमध्ये शालेय पोषण आहारातील १३८ तांदूळाच्या पोत्यांचा साठा आढळून आला होता़ त्यानंतर हा साठा ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांच्या समोरच सील केला होता़ दरम्यानच्या कालावधीत शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यळगुडकर, मुख्याध्यापक आशोक साळुंखे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद मोरे आणि पोलीस पाटील रमेश तुळसणकर यांनी धान्य सील केलेली खोली परस्पर उघडली़ त्यातील धान्य काढून आरवली बाजारपेठेत विकल्याचे समोर आले होते़ ग्रामस्थांनी याबाबत पोेलीस स्थानकात तक्रारही दाखल केली होती़ मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती़ त्यानुसार शिक्षण विभागातर्फे चौकशी सुरू करण्यात आली त्यामध्ये १३८ पैकी तांदूळाची ६२ पोत्यांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. आता मुख्याध्यापकावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)
मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल होणार
By admin | Updated: June 22, 2014 01:41 IST