चिपळूण : येथील नगर परिषदेची अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम बुधवारी पुन्हा सुरूझाली. बहादूरशेख परिसरातील अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या. न्यायालयात याबाबत दाखल झालेल्या तक्रारीत नगर परिषदेच्या बाजूनेच निकाल लागल्यामुळे नगर परिषदेने ही धडक कारवाई केली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय राठोड यांनी प्रथम चिपळूण शहरातील अनधिकृत बांधकामे काढली होती. त्यानंतर काही काळ उसंत घेण्यात आली. आता पुन्हा ही मोहीम सुरू झाली आहे. बुधवारी बहादूरशेख नाका येथील अनेक अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या. विशेष म्हणजे यापूर्वी ही कारवाई करताना तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला होता. बहादूरशेख नाक्यात असणाऱ्या झोपड्या पावसाळ्यानंतर काढण्याची तयारी दर्शविण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात कृती झाली नाही. काही पुढाऱ्यांनी यामध्ये श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर काहीजण न्यायालयात गेले होते; परंतु न्यायालयानेही पालिकेच्या बाजूने निकाल दिला. मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्तात बुधवारी ही अनधिकृत बांधकामे हटविली. याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गालगत असलेली काही बांधकामेही हटविण्यात आली.
चिपळुणात झोपड्यांवर हातोडा
By admin | Updated: January 13, 2016 22:23 IST