गुहागरातील बागायतदार वानरांच्या त्रासाने हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:55+5:302021-04-13T04:29:55+5:30
असगोली : कोकणात शेती व बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीचा हंगाम ...
असगोली : कोकणात शेती व बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीचा हंगाम झाल्यावर येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवड करण्याकडे कल असतो. मात्र, वानर आणि वन्यप्राणी यांनी भरवस्तीत आपला मोर्चा वळवल्याने येथील बागायतदार व शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. वन विभाग तसेच प्रशासनाने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. या जंगलतोडीमुळे अनेक गावांशेजारील जंगले ओसाड पडत आहेत. त्यामुळे जंगली जनावरे लोकवस्तीकडे वळली आहेत. त्यातच वानरांनी तर अक्षरशः लोकवस्तीत धुमाकूळ घातला आहे. वानरांच्या अनेक टोळ्या लोकवस्तीत शिरत असून घरावर उड्या मारत आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे, कौले फुटून नुकसान होत असल्याने तालुक्यातील नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे घरासमोरील परसबागेत चिकू, पपई, पेरू, केळी अशा फळझाडांनादेखील या वानरांनी लक्ष केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. बागायतदार वानरांना पळवून लावण्यासाठी फटाके लावतात. मात्र, ही वानरे फटाक्याच्या आवाजालाही घाबरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे.