गुहागर : तालुक्यातील परचुरी आणि दापोली या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या परचुरी - फरारे फेरीबोटीची चाचणी यशस्वी झाली आहे. या फेरीबोट सेवेमुळे धोपावे - दाभोळ व तवसाळ - जयगडनंतर परचुरी - फरारे ही आणखी एक फेरीबाेट सेवा दिवाळीपर्यंत सुरु होणार आहे. धोपावे फेरीबोटीचे मालक डॉ. चंद्रकांत मोकल यांच्या उपस्थितीत या फेरीबोट सेवेची प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली. या फेरीबोट सेवेमुळे गुहागर - दापोली हे तालुके जोडले जाणार असून, तालुक्यातील प्रवाशांचे मुंबई अंतरही कमी होणार आहे.
गुहागर तालुक्यातील धोपावे ते दाभोळ तसेच रत्नागिरी तालुक्याला जोडणारी तवसाळ - जयगड ही फेरीबोट सेवा सुरू आहे. आता परचुरी - फरारे ही फेरीबोट सेवा सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा गुहागर - दापोली तालुके जोडले जाणार आहेत. गुहागर - परचुरी हे अंतर २५ किलोमीटर असून, परचुरी - फरारे फेरीबोट मार्ग दीड किलोमीटरने कमी हाेणार आहे. तसेच हरारे - उन्हवरे मार्ग पाच किलोमीटर, उन्हवरे - वाकवली २५ किलोमीटर, वाकवली - खेड १५ किलोमीटरने कमी हाेणार आहे. या नव्या मार्गामुळे गुहागरवासीयांचा मुंबई प्रवास सुखकर हाेणार आहे. या फेरीबोट सेवेमुळे तळवली - परचुरी बाजारपेठांना महत्त्व येणार आहे. या मार्गावरील वाढती रहदारी लक्षात घेता नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.