लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत नेहमीच ओरड हाेत असताना नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांमुळे गणपतीची मूर्ती कशी नेणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या नाचणे ग्रामपंचायतीला अखेर गुरुवारी जाग आली असून, खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील समस्या गेले अनेक वर्षे जैसे थेच आहेत. या समस्यांबाबत ना ग्रामस्थांना काही पडलेले ना सत्ताधाऱ्यांना, मात्र, निवडणुकीच्या ताेंडावर या समस्या साेडविण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारीही आश्वासनच विसरून जात आहेत. आता या समस्यांमध्ये रस्त्याच्या दयनीय अवस्थेची भर पडली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून प्रवास करणे धाेकादायक बनला आहे. ग्रामपंचायतीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खड्ड्यांकडेही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या ग्रामपंचायतीत विराेधी पक्षाने शिरकाव केला असला तरी तेही सत्ताधाऱ्यांच्याच वळचणीला गेल्याने तेही मूग गिळून गप्प असल्याचे दिसत आहे. त्यातही पक्षाच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर बाेट ठेवणारे पक्षातील ज्येष्ठ नेतेही आता गप्प आहेत.
ग्रामपंचायतीजवळच माेठ्या प्रमाणात रस्त्यावर खडी आल्याने तेथून जाणे जीवघेणे ठरत आहे. या भागात दाेन गणेश चित्रशाळा असून, तेथून मूर्ती नेणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. अनेकांनी खडतर रस्त्यामुळे दाेन दिवसांपासून मूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खड्ड्यांमुळे मूर्ती नेताना अनेकांच्या पाेटात भीतीचा गाेळा येत आहे. खड्ड्यातून मूर्ती नेताना मूर्तीचे काही झाले तर जबाबदार काेण, असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेले अनेक दिवस रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नाचणे ग्रामपंचायत प्रशासनाला गुरुवारी गणेशाेत्सव असल्याचा साक्षात्कार झाला आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, तेही करताना केवळ जांभा दगड टाकण्यात आल्याने कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सत्तेसाठी मतांचा जाेगवा मागणाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच पडलेले नाही, अशी टीका आता या परिसरातून हाेऊ लागली आहे.