चिपळूण : अपुऱ्या वाहकसंख्येमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुढे आलेल्या कोयना प्रकल्पातील वाहनचालक शशिकांत देसाई (वय ४९) यांचा १४ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेत त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देसाई हे पाच महिने जीव धोक्यात टाकून कोरोनाबाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी अविरतपणे सेवा बजावत होते. मूळचे कोयनानगर येथील रहिवासी असलेले शशिकांत देसाई हे अनेक वर्षं अलोरे येथील कोयना प्रकल्पात चालक म्हणून कार्यरत होते. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे रुग्णवाहिकांवर चालक नसल्याने गैरसोय होऊ लागली. अखेर ७मे रोजी देसाई यांना आपत्ती व्यवस्थापन कार्यात चालक म्हणून सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार देसाई यांनी ही जबाबदारी तत्काळ स्वीकारली.
त्यानंतर अखंडितपणे चालक म्हणून ते काम करीत होते.
हे काम करीत असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला. त्यानंतर उलट्या व जुलाब होऊन त्यांची प्रकृती गंभीर बनली. अशातच त्यांचा मृत्यू झाला. देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.