दापाेली : मागील वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या नावाखाली सर्व काही आलबेल सुरू ठेवत फक्त नाभिक व्यवसायामुळे कोरोना जास्त पसरतो, असे भासवत सलून व्यवसायावर गदा आणली आहे. त्यामुळे नाभिक समाजाची कुटुंबे उद्ध्वस्त हाेत असून, दोन समाज व्यावसायिकांनी उपासमारीला कंटाळून आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपविला आहे. हातावरच पोट असणाऱ्या या नाभिक समाजाचा आता आणखीन अंत पाहू नये, निदान आता तरी या शासनाने समाजाप्रती सहानुभूती दाखवत आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी श्री संतसेना नाभिक समाज संघटनेचे दापोली तालुकाध्यक्ष गेश शिंदे यांनी केली आहे.
शिंदे यांनी सांगितले की, १२ बलुतेदार पद्धतीमध्ये काम करत असताना या समाजाने कधी पैशांचा विचार केला नाही. अन्नधान्याच्या स्वरूपात पडपनीद्वारे मिळेल ते पदरात घेऊन आपली उपजीविका चालविली व सामाजिक बांधीलकी जपली; पण कधी लाचारी पत्करली नाही. खेडेगावात किंवा शहरात काम करत असताना पैशांसाठी कधी कुणाला अडवलं नाही. नाभिक व्यवसायामुळे एकाला तरी कोरोना झाला असे एक तरी उदाहरण असेल तर दाखवा, असा सवाल उपस्थित करत सर्व गरजू अल्पसंख्याक, आदिवासी, रिक्षाचालक, घरेलू उद्योजक, खोके व्यावसायिक अशा अनेक लोकांना प्रत्येकी १५०० रुपये मदत जाहीर केली. मात्र, ह्यात हातावर पोट असलेल्या नाभिक व्यावसायिकांचा कुठेही उल्लेख दिसून आला नाही. हा अन्यायच म्हणावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.